इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

निर्गम 28

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर मोशेला म्हणाला, याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे येण्यास सांग.
2आणि गौरवासाठी व शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी पवित्र वस्रे तयार कर.
3ही वस्रे बनवणारे कारागीर ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना अहरोनाची वस्रे तयार करण्यास सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल.
4तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून कारागिरांनी त्यांच्यासाठी ही पवित्र वस्त्रे ऊरपट, एफोद, झगा, चौकड्याचा अंगरखा, मंदिल व कमरबंद तयार करावीत.
5त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्रे तयार करावीत.
6सोन्याची जर व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलम सणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करून घ्यावे;
7एफोदाच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात, त्याची दोन टोके जोडावी.
8एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली एक पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याच्या जरीची, व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची ती असावी.
9मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी.
10त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसऱ्या रत्नांवर कोरावी.
11रत्नावर कोरीव काम करणारा कारागीर कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नांवर इस्राएलाच्या बारा पुत्रांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावीत.
12ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावी. ती इस्राएल लोकांची स्मारकरत्ने होत, म्हणजे अहरोन त्यांची नावे परमेश्वरासमोर आपल्या दोन्ही खांद्यांवर स्मरणार्थ वागवील.
13त्याचप्रमाणे सोन्याची जाळीदार कोंदणे करावीत.
14पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या कराव्यात व त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणात बसवाव्या.
15न्यायाचा ऊरपटही तयार कुशल कारागिराकडून तयार करावा. जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा;
16तो चौरस व दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी प्रत्येकी एक वीत असावी.
17त्यामध्ये रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
18दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनीलमणी व हिरा;
19तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
20आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत.
21ऊरपटावर इस्राएलाच्या प्रत्येक पुत्राच्या नावाच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत. त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत. मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.
22ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्यात.
23ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावाव्यात;
24ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या या दोन कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घालाव्यात.
25पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूला लावाव्यात.
26सोन्याच्या आणखी दोन कड्या करून न्यायाच्या ऊरपटाच्या आतल्या दोन्ही कोपऱ्यांना एफोदाच्या बाजूला लावाव्या.
27सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या खांदपट्ट्याखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पट्टीवर लावाव्या.
28त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने बांधाव्या, ह्याप्रमाणे तो कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर राहील, आणि ऊरपट एफोदावरून घसरणार नाही.
29अहरोन पवित्रस्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलाच्या मुलांची नावे कोरलेली असतील, त्यामुळे परमेश्वरास इस्राएलाच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील.
30ऊरपटात तू उरीम व थुम्मीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील. त्यामुळे इस्राएल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल.
31एफोदाबरोबर घालावयाचा झगा संपूर्ण निळ्या रंगाचा करावा;
32त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.
33निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत;
34त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरू अशी क्रमवार ती असावीत.
35सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल; त्यामुळे तो मरावयाचा नाही.
36शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात तशी तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत.
37ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला समोरील बाजूस निळ्या फितीने बांधावी;
38ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी. ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक परमेश्वरास पवित्र अर्पण करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; त्यामुळे ती दाने परमेश्वरास मान्य ठरतील.
39चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा करावा व एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.
40अहरोनाच्या पुत्रांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; ही वस्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावी.
41तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या पुत्रांना ही वस्रे घालून, त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.
42“त्यांच्यासाठी सणाच्या कापडाचे चोळणे कर म्हणजे कमरेपासून मांडीपर्यंत त्यांचे अंग झाकलेले राहील.
43आणि अहरोन व त्याचे पुत्र दर्शनमंडपामध्ये प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यास जातील तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावे; तसे न केल्यास, दोषी ठरून ते मरतील; अहरोनाला व त्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.