इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

निर्गम 26

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावेत. व त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढावेत.
2प्रत्येक पडद्याचे मोजमाप एक सारखेच असावे म्हणजे लांबी अठ्ठावीस हात व रूंदी चार हात असावी;
3त्यांपैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसऱ्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;
4जेथे एक पडदा दुसऱ्याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी करावीत, तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर
5एका पडद्याला पन्नास बिरडी कर व दुसऱ्या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावी;
6पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या साहाय्याने ते दोन भाग एकत्र असे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप तयार होईल.
7त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावेत. हे पडदे अकरा असावे.
8हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे तीस हात लांब व चार हात रुंद अशा मापाचे बनवावेत.
9त्यातून पाच पडदे एकत्र जोडावे आणि सहा पडदे एकत्र जोडावे. सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूला दुमडावा.
10पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तशीच पन्नास बिरडी करावीत;
11नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबू अखंड होईल.
12या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धा भाग पवित्र निवासमंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील.
13आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर या बाजूला व हातभर त्या बाजूला निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला लोंबते ठेवावे.
14तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व दुसरे समुद्र प्राण्याच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.
15पवित्र निवासमंडपाला बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्यांचा आधार करावा.
16प्रत्येक फळीची लांबी दहा हात व उंची दीड हात असावी.
17प्रत्येक फळी दुसऱ्याशी जोडण्यासाठी दोन बाजूला दोन कुसे करावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात.
18पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात.
19फळ्यांसाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे चांदीच्या दोन बैठका असाव्यात.
20पवित्र निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात;
21आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात.
22पवित्र निवासमंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फळ्या कराव्यात;
23आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फळ्या कराव्यात.
24कोपऱ्याच्या फळ्या खालच्या बाजूला जोडाव्यात; त्यांच्यावरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील, दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे.
25पवित्र निवासमंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठ फळ्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे चांदीच्या सोळा बैठका असतील.
26त्यांच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व
27दुसऱ्या बाजूस पाच अडसर असावेत; आणि त्यांच्या पाठीमागच्या म्हणजे पश्चिम बाजूस पाच अडसर असावेत.
28मध्य भागावरील अडसर लाकडांच्या फळ्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.
29फळ्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात.
30मी तुला पर्वतावर दाखवल्याप्रमाणे पवित्र निवासमंडप बांधावा.
31तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढून घ्यावेत.
32बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत;
33सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;
34परमपवित्रस्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.
35अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला मेज ठेवावा; तो निवासमंडपाच्या उत्तर बाजूला असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.
36“पवित्र निवासमंडपाच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करून त्यावर वेलबुट्टीदार पडदा बनवावा.
37हा पडदा लावण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत व ते सोन्याने मढवावेत; त्यांच्याकरिता पितळेच्या पाच बैठका बनवाव्यात; हा पडदा अडकविण्यासाठी सोन्याच्या आकड्या कराव्यात.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.