इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

निर्गम 12

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग मोशे व अहरोन मिसर देशामध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
2“हा महिना तुमच्यासाठी आरंभीचा महिना व्हावा. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा.
3इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे.
4आणि एक कोकरू, खाण्यासाठी घरातील माणसे थोडी असली तर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती मनुष्यांना पुरेल याचा अंदाज घ्यावा.
5तो कोकरा एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा, तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा.
6या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्यास वधावे.
7त्या कोकऱ्याचे रक्त घेऊन ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीवर लावावे.
8त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून कडू भाजी व बेखमीर भाकरीबरोबर खावे.
9तुम्ही त्याचे मांस कच्चेच किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडी हीसुद्धा खावीत.
10त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि सकाळपर्यंत काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.
11ते तुम्ही या प्रकारे खावे: तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
12आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे.
13परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक खूण असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसर देशाला मारीन तेव्हा कोणताही अनर्थ तुम्हावर येणार नाही व तुमचा नाश होणार नाही
14हा दिवस तुम्हास आठवणीदाखल होईल, हा दिवस परमेश्वरासाठी तुम्ही विशेष उत्सवाचा सण म्हणून पाळावा. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा विधी समजून पाळावा.
15सात दिवस बेखमीर भाकर खावी; पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्यास तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे.
16या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; या दोन्ही दिवशी काही काम करू नये. फक्त खाण्यापिण्याच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये.
17या प्रकारे बेखमीर भाकरीच्या सण पाळावा. कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वांना मिसर देशातून बाहेर काढून आणले. म्हणून हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा.
18तेव्हा पहिल्या महिन्यातील चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या.
19या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमिराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो, किंवा स्वदेशी असो त्यास इस्राएलाच्या मंडळीतून बाहेर टाकावे.
20त्या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तुम्ही घरोघरी बेखमीर भाकरच खावी.”
21मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्या लोकांस एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा.
22मग एजोब झाडाची जुडी घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळावी आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळपट्टीवर लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये.
23कारण त्या वेळी परमेश्वर मिसरामधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळपट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो ते दार ओलांडून जाईल; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात जाऊ देणार नाही.
24हा विधी तुम्हास व तुमच्या पुत्रपौत्राला निरंतरचा आहे असे समजून तो पाळावा.
25परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हास देणार आहे त्यामध्ये तुम्ही जाल तेव्हा तुम्ही हा उपासनेचा प्रकार म्हणून पाळावा.
26जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हास विचारतील की या उपासनेचा अर्थ काय आहे?
27तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा त्या दिवशी परमेश्वराने मिसराच्या लोकांस मारले व आपल्या घरांना वाचवले त्या वेळी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला, हे ऐकून लोकांनी नतमस्तक होऊन दंडवत घातले.
28परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.
29मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनारूढ असलेल्या फारोच्या ज्येष्ठ पुत्रापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत सर्व आणि तसेच गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले.
30रात्रीच्या वेळी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसराचे लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहा:कार उडाला, कारण ज्यात कोणी मरण पावले नाही असे एकही घर राहिले नाही.
31तेव्हा रातोरात फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले फारो त्यांना म्हणाला, तुम्ही व तुमचे सर्व इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन तुमच्या परमेश्वराची उपासना करा.
32आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचे कळप, व गुरेढोरे ही तुमच्याबरोबर घेऊन चालते व्हा, आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या.
33लोकांनी देशातून तात्काळ निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लावला; कारण ते म्हणाले, आम्ही सर्वजण मेलोच आहोत.”
34इस्राएल लोकांनी आपली मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहीत कापडात गुंडाळून आपल्या खांद्यावर घेतली.
35इस्राएली लोकांनी मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मिसऱ्याजवळ जाऊन कपडे, सोन्यारुप्याचे दागदागिने मागून घेतले.
36मिसरी लोकांची कृपादृष्टी इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले आणि म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिसरी इस्राएल लोकांस लुटले.
37तेव्हा इस्राएल लोक मिसर देशामधून निघून रामसेस शहरापासून प्रवास करीत सुक्कोथ नगरास गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते.
38त्यांच्या सोबत लोकांचा मिश्र समुदाय गेला. तसेच पुष्कळ कळप, गुरेढोरे, जनावरे होती.
39त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती. त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या. त्यांना जबरीने बाहेर काढण्यात आले होते. त्यांना थांबण्यास वेळ नव्हता. तसेच खावयास काही विशेष जेवण करता आले नाही;
40इस्राएली लोक मिसर देशामध्ये येऊन चारशे तीस वर्षे राहिले होते.
41मग चारशे तीस वर्षांच्या अखेरीस बरोबर त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून बाहेर निघाल्या.
42परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर काढिले याकरिता ही परमेश्वरासाठी जागरणाची रात्र म्हणून अवश्य पाळावी. इस्राएल लोकांनी पिढ्यानपिढ्या ही रात्र परमेश्वरासाठी जागरणाची म्हणून अवश्य पाळावी.
43परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले, “वल्हांडण सण पाळण्याविषयीचे नियम असे आहेत. कोणाही परदेशी मनुष्याने वल्हांडणाचे भोजन खाऊ नये.
44परंतु जर कोणी एखादा गुलाम विकत घेतला असेल आणि त्याची सुंता त्याने करवून घेतली असेल तर मग त्याने त्यातले खावे;
45परंतु उपरा मनुष्य किंवा मोलकरी ह्यांपैकी कोणीही ते खाऊ नये.
46प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये.
47सर्व इस्राएल मंडळीने हा सण पाळलाच पाहिजे.
48परदेशीय एकजण तुम्हाबरोबर राहत असेल व जर त्यास परमेश्वराच्या वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्याने सुंता करून घेतलीच पाहिजे. म्हणजे मग तो इस्राएल लोकांसारखा रहिवासी होईल. मग त्याने वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी व्हावे; परंतु त्याने सुंता करून घेतली नाहीतर त्यास त्यातले काही खाता येणार नाही.
49हे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत, मग तो इस्राएली असो किंवा तुमच्या देशात राहणारा इस्राएली नसलेला कोणी परदेशी असो. प्रत्येकासाठी सारखेच नियम आहेत.”
50तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यांना ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व इस्राएली लोकांनी पाळल्या.
51अशा रीतीने त्याच दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएली लोकांच्या सशस्त्र टोळ्या करून त्यांना टोळीटोळीने मिसर देशातून बाहेर काढून आणले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.