इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

दानिएल 8

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला.
2मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम परगण्यातील शूशन, तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो.
3मी डोळे वर करून पाहिले तो मला माझ्यासमोर दोन शिंग असलेला एडका, नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याचे एक शिंग दुसऱ्यापेक्षा लांब होते. पण लांब शिंगाची वाढ लहानपेक्षा हळूहळू झाली होती, आणि ते हळू वाढत आहे.
4मी पाहिले तो एक एडका पश्चिमेस नंतर उत्तरेस आणि नंतर दक्षिणेस धडक मारत होता, कोणी पशू त्यासमोर उभा राहू शकला नाही. त्याच्या तावडीतून कोणी सोडवण्यास सबळ नव्हता त्यास जे पाहिजे ते तो करी आणि तो महान झाला.
5जसा मी त्याविषयी विचार करत होतो, तेव्हा मला एक बकरा पश्चिमेकडून येताना दिसला. तो सर्व पृथ्वी आक्रमून आला. धावताना त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते त्या बकऱ्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक मोठे शिंग होते.
6मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला.
7मी पाहिले तो बकरा त्या एडक्याजवळ आला तो एडक्यावर रागे भरुन होता आणि त्याने एडक्यास धडक दिली आणि त्याची दोन शिंगे तोडून टाकली. एडका त्याच्यासमोर उभा राहण्यास शक्तीहिन होता. बकऱ्याने त्यास जमिनीवर पाडून तुडवून टाकले त्याच्या हातून त्या एडक्यास सोडविण्याचे कोणालाही सामर्थ्य नव्हते.
8मग तो बकरा मोठा झाला पण तो जेव्हा प्रबळ झाला, तेव्हा त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्या जागेवर चार नवीन शिंगे फुटली ती चारही बाजूस ठळक होती.
9त्यातल्या एकातून एक लहान शिंग निघाले मग ते दक्षिणेस पुर्वेस आणि इस्राएलास गौरवी प्रदेशात वाढत गेले.
10त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले.
11आणि त्याने आपणाला त्या सैन्याच्या अधिपतीबरोबर मोठ केले, आणि त्याचे नित्याचे होमार्पण बंद केले, व त्याच्या पवित्रस्थानाची जागा पाडून टाकली.
12आणि लोकांच्या पातकामुळे नित्याच्या होमार्पणासहित ते सैन्य त्याच्या स्वाधीन करण्यात आले; तेव्हा त्याने सत्य मातीस मिळवले; आणि ते कार्य करीत व समृद्ध होत गेले.
13नंतर मी एका पवित्र पुरुषास, दुसऱ्या पवित्र पुरुषासोबत बोलताना ऐकले, “हा रोजचा यज्ञयांग नाशदायी पाप, वेदी आणि सैन्य तुडवणे, या दृष्टांतातील गोष्टी किती दिवस चालत राहणार?”
14तो मला म्हणाला, “हे सर्व दोन हजार तीनशे संध्याकाळ व सकाळ चालत राहणार नंतर वेदीची योग्य स्थापना होईल.”
15मग मी दानीएलाने हा दुष्टांत पाहून त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत असता पाहा एक मानवासारखा कोणी तरी माझ्यासमोर उभा होता.
16मी एक मानवी वाणी ऐकली; ती उलई नदीच्या काठामधून आली ती म्हणाली, “गब्रीएला या पुरुषास हा दृष्टांत समजावून सांग.”
17मग तो, जेथे मी उभा होतो, तेथे आला तेव्हा मी घाबरुन पालथा पडलो, तो मला म्हणाला, “मानवपुत्रा हा दृष्टांत समजून घे, हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”
18जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी पालथा पडलो मला गाढ झोप लागली. मग त्याने मला स्पर्श करून उभे केले.
19तो म्हणाला, “बघ, कोपाच्या काळात काय होईल ते मी तुला दाखवतो, कारण तो दृष्टांत शेवटच्या नेमलेल्या दिवसाचा आहे.
20जो मेंढा तू पाहिला त्यास दोन शिंगे होती, ती माद्य व पारस यांचे राजे आहेत.
21तो बकरा म्हणजे ग्रीसचा राजा, त्याच्या डोळयाच्या मधोमध असलेले शिंग म्हणजे पहिला राजा आहे.
22जसे त्याचे तुटलेले शिंग ज्याच्या जागी चार शिंग आली, तसा त्या देशातून चार राज्याचा उदय होईल, पण त्याचासारखा बलवान एकही नसणार.
23त्या राज्याच्या शेवटच्या काळात लोकांच्या पातकाचा घडा भरला त्यावेळी उग्ररुपी बुध्दीमान राजा उदयास येईल.
24त्याची सत्ता महान होईल पण ती त्याच्या स्वबळाने नाही तो दूरपर्यंत पोहचणारा विनाश करील तो जे काही करील त्यामध्ये त्याचा विकास होईल तो पवित्र व बलवानांचा नाश करील.
25तो कपटाने आपली कारस्थाने सिध्दीस नेईल तसेच तो अधिपतींच्या अधिपतींविरुद्ध विरोधात उठेल आणि त्याचा चुराडा होईल पण मनुष्याच्या बलाने नाही.
26हा सांज-सकाळाचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे पण तू हा गुप्त ठेव कारण तो भविष्यात अनेक दिवसानंतर पूर्ण होईल.”
27तेव्हा मी दानीएल बरेच दिवस अशक्त होऊन आजारी पडलो मग मी बरा होऊन राजकामासाठी गेलो तो दृष्टांत मी सगळ्यांना सांगितला पण त्यास समजणारा कोणीच नव्हता.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.