इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

आमोस 8

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वराने मला हे दाखवले, पाहा, उन्हाळ्यातल्या फळांची टोपली दिसली.
2तो म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे; मी त्यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करणार नाही.
3परमेश्वर, असे म्हणातो, त्या दिवसात मंदिरातील गाणे विलाप होतील. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील, प्रत्येक स्थानांत लोक गुपचूप ती बाहेर टाकून देतील.”
4जे तुम्ही गरिबांना तुडविता, आणि देशातील गरीबांना काढता. ते तुम्ही हे ऐका.
5तुम्ही म्हणता “चंद्रदर्शन केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू. शब्बाथ, केव्हा संपेल? म्हणजे मग आम्हास गहू विकता येईल? मग आपण एफा लहान करू, व शेकेल नाणे मोठे करू व कपटाचे तराजू घेऊन फसवू.
6आपण चांदी देऊन गरीबांना आणि एका जोड्याच्या किंमतीत गरजूंना विकत घेऊ आणि गव्हाचे भूसही विकून टाकू.”
7परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहीली आहे की, “खचित त्यांच्या कर्मातले कोणतेही मी विसरणार नाही.
8त्यांमुळे भूमी हादरणार नाही काय? आणि या देशात राहणारा प्रत्येकजण शोक करणार नाही काय? त्यातील सर्व नील नदीप्रमाणे चढेल, आणि मिसरातल्या नदी सारखी खवळेल व पुन्हा खाली ओसरेल.”
9परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात,” “मी सूर्याला दुपारीच मावळवीन आणि पृथ्वीला निरभ्र दिवशी अंधकारमय करीन.
10मी तुमचे उत्सव पालटून शोक असे करीन, आणि तुमची सर्व गाणी पालटून विलाप अशी करीन. मी प्रत्येकाला गोणताटाचे कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. ए कुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”
11परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात दुष्काळ पाठवीन, ते दिवस येतच आहेत, तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल, पाण्याचा दुष्काळ नसेल, परंतू परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल.”
12“लोक समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील. परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील. पण त्यांना ते सापडणार नाहीत.
13त्यावेळी, सुंदर तरुण-तरुणी तहानेने दुर्बल होतील.
14जे शोमरोनाच्या पापाची शपथ वाहतात, आणि ‘हे दाना’, तुझा परमेश्वर जिवंत आहे, असे म्हणतात, आणि बैर-शेब्याचा देव जिवंत आहे, असे म्हणतात, ते पडतील, आणि ते परत कधीही उठणार नाहीत.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.