इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

आमोस 3

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1इस्राएलाच्या लोकांनो, जे सर्व घराणे मी मिसरामधून बाहेर आणले त्यांच्याविषयी, परमेश्वराने तुमच्याविरुध्द जे वचन सांगितले ते ऐका,
2“पृथ्वीवरील सर्व घराण्यांमधून, मी फक्त तुम्हास निवडले आहे. म्हणून मी तुमच्या सर्व पापांसाठी तुम्हास शिक्षा करीन.”
3दोन मनुष्यांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकतील काय?
4शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय? तरुण सिंहाने काही धरले नसेल तर त्याच्या गुहेतून तो गुरगुरेल काय?
5जाळ्यावाचून पक्षी भूमीवरच्या पाशांत पडेल काय? पाशांत काही सापडले नाही तर तो पाश वर उडेल काय?
6रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भिणार नाहीत काय? नगरावर संकट आले आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल का?
7खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून, प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.
8सिंहाने डरकाळी फोडल्यास, कोण भिणार नाही? परमेश्वर बोलला आहे; तर कोणाच्याने भविष्य सांगितल्यावाचून राहवेल?
9अश्दोद व मिसर देशाच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर एकत्र जमा, आणि त्यामध्ये किती भयंकर गोंधळ आणि काय जुलूम आहेत ते पाहा.
10परमेश्वर असे म्हणतो, ते आपल्या राजवाड्यात हिंसा व नाश साठवतात, ते योग्य आचरण जाणत नाहीत.”
11यास्तव परमेश्वर म्हणतो: “त्या देशाला शत्रू घेरतील, तो तुमचे सामर्थ्य तुमच्यापासून खाली आणेल, आणि तुझे महाल लुटले जातील.”
12परमेश्वर असे म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून फक्त दोन पाय, किंवा कानाचा तुकडा वाचवितो, त्याचप्रकारे इस्राएली लोक जे शोमरोनामध्ये पलंगाच्या कोपऱ्यात किंवा खाटेच्या रेशमी गाद्यांवर बसतात ती वाचवली जातील.”
13सेनाधीश परमेश्वर असे म्हणतोः “ऐका, आणि याकोबाच्या घराण्या विरूद्ध साक्ष द्या.
14कारण ज्या दिवसात मी इस्राएलाला त्याच्या पापा बद्दल शिक्षा करीन तेव्हा मी बेथेलच्या वेद्याही नष्ट करीन, वेदीची शिंगे तोडली जातील आणि ती भूमीवर पडतील.
15हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पुष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.