इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

प्रेषितांची कृत्ये 8

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1स्तेफनाचा जो खून झाला त्यास शौलाची संमती होती. त्या दिवसापासून यरूशलेम शहर; येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला, प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहूदीया व शोमरोन प्रांताच्या, कानाकोपऱ्यात पांगून गेले.
2काही धार्मिक मनुष्यांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला.
3शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली; तो घरोघर जाई विश्वास ठेवणारे पुरूष व स्त्रिया यांना धरून खेचून नेई, व तुरुंगात टाकीत असे.
4विश्वास ठेवणारे सगळीकडे पांगले होते जेथे कोठे विश्वास ठेवणारे जात तेथे ते लोकांस सुवार्ता सांगत.
5फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले.
6फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे, ते ती लक्षपूर्वक ऐकत असत.
7कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले.
8यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले.
9शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता, तो जादूचे प्रयोग करीत असे; त्याच्या प्रयोगामुळे शोमरोन प्रांतातील लोक आश्चर्यचकित होत असत, तो स्वतःला फार मोठा समजत असे.
10अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत, ते म्हणत असत, “देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे.”
11त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांस चकीत केले, असल्याने लोक त्याचे ऐकत असत.
12परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांस सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचवेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांच्यात जसे पुरूष होते तशा स्त्रियाही होत्या.
13स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला: आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर, तो फिलिप्पबरोबर राहू लागला; आणि झालेले चमत्कार आणि अद्भूत चिन्हे पाहून, शिमोन आश्चर्याने थक्क झाला.
14यरूशलेम शहरामधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठवले.
15पेत्र व योहान जेव्हा आले, तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून, प्रार्थना केली.
16या लोकांचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता.
17मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.
18शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊ करून म्हटले.
19“मी ज्याच्यावर हात ठेवीन त्यास पवित्र आत्मा मिळेल, असा अधिकार मलासुद्धा द्या.”
20पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो; कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केला.”
21या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही.
22तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्यासाठी पश्चात्ताप कर, प्रभूला प्रार्थना कर, कदाचित तुइया अंतःकरणातील कल्पनेची तो तुला क्षमा करील.
23कारण तुझ्या मनात कटू मत्सर भरलेला आहे व तू पापाच्या बंधनात आहेस, हे मला दिसून आले आहे.
24शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा.
25नंतर पेत्र व योहान ह्यांनी आपली साक्ष लोकांस देऊन, “प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरूशलेम शहरास परत आले, परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.”
26परमेश्वराचा दूत फिल्लीपाशी बोलला तो म्हणाला, “ऊठ आणि यरूशलेम शहराहून गज्जा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” तो रस्ता वाळवंटातून जातो.
27मग तो उठला. व गेला, रस्त्यात त्यास एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता, तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता, तो यरूशलेम शहरास उपासना करण्यासाठी गेला होता.
28आता तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टयाचा ग्रंथ वाचत होता.
29पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा.”
30मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा त्याने त्यास यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, फिलिप्प त्यास म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हास समजते काय?”
31तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे, समजेल कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे?” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलावले.
32शास्त्रलेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढीलप्रमाणे होता, “वधावयला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता; लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही:
33त्यास लज्जित केले गेले त्याच्या लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही: त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.”
34तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “कृपाकरून मला सांगा, हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे, की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे?”
35मग फिलिप्पाने तोंड उघडले; व शास्त्रलेखातील यशया संदेष्ट्याच्या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्यास सांगितली.
36ते दोघे प्रवास करीत असताना, एका तळ्याजवळ आले; तेव्हा अधिकारी म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे; माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?”
37फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे, त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.
38आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली, नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरून पाण्यात गेले, आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला.
39ते जेव्हा पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले; आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही, पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला.
40आपण अजोत नगरात आहोत. असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली, नंतर तो कैसरीया शहरास गेला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.