इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

प्रेषितांची कृत्ये 3

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या तीन वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते.
2आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या सुंदर नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत.
3पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली.
4तेव्हा पेत्र, योहानाबरोबर त्यास निरखून पाहत, म्हणाला, “आमच्याकडे पाह.”
5तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल, अशी आशा धरून त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले.
6आणि पेत्र म्हणाला, “रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही; पण जे माझ्याजवळ आहे. ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.”
7आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले.
8आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला.
9आणि सर्व लोकांनी त्यास चालताना व देवाची स्तुती करताना पाहिल.
10आणि जो भवनाच्या सुंदर दाराजवळ भीक मागण्यासाठी बसत असे; तो हाच आहे असे त्यांनी त्यास ओळखले तेव्हा त्यास जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले.
11तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाचा द्वारमंडप म्हटलेल्या ठिकाणी, त्याच्याकडे धावत आले.
12हे पाहून पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, तो म्हणाला, “अहो इस्राएल मनुष्यांनो, यावरुन तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?
13अब्राहामाचा, इसहाकाचा, व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्यास तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्यास सोडून देण्याचे ठरवले असताही त्यास तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
14तुम्ही तर जो पवित्र व नीतिमान त्यास नाकारले, आणि घातक मनुष्य आम्हास द्यावा असे मागितले.
15आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्यास देवाने मरण पावलेल्यामधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत.
16आणि त्याच्या नावाने त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता, व ओळखता त्या या मनुष्यास शक्तीमान केले आहे. आणि, त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.
17तर आता भावांनो, मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले आहे,
18परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी, म्हणून देवाने आपल्या सर्व संदेष्ट्याच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते, ते याप्रमाणे पूर्ण केले आहे.
19तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;
20आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला, ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.
21सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यंत स्वर्गात त्यास राहणे अवश्य आहे, त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्ट्याच्या तोंडून सांगितले आहे.
22मोशेने तर सांगितले की, ‘प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावांमधून उठवील. तो जे काही तुम्हास सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’
23आणि असे होईल की जो कोणी जीव त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल.
24आणखी, शमुवेलापासून जे संदेष्ट्याच्या परंपरेने झाले, जितके बोलत आले, त्या सर्वानी या दिवसाविषयी कळवले.
25तुम्ही संदेष्ट्याचे मुले आहात आणि तुझ्या संततीद्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून, ‘देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला त्या कराराची तुम्ही मुले आहा.’
26देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, यासाठी की, त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.