इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

प्रेषितांची कृत्ये 21

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस बेटास आलो, दुसऱ्या दिवशी आम्ही रुद बेटास गेलो, तेथून आम्ही पातरा शहरास गेलो.
2तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हास आढळले, तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.
3तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले, परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही सरळ सिरीया प्रांताला रवाना झालो व सोर येथे उतरलो, कारण तेथे जहाजातील माल उतरावयाचा होता.
4तेथे येशूचे काही शिष्य आम्हास आढळले आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो, पवित्र आत्म्याच्या सूचनेवरून त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये.
5आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरू केला, त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहराबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली.
6मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.
7सोरापासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला व पोलेमा येथे उतरलो आणि तेथील बंधुजनांना भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो.
8आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो, तो निवडलेल्या सात सेवकांपैकी एक होता.
9त्यास चार मुली होत्या, त्यांची लग्ने झालेली नव्हती, या मुलींना देवाच्या गोष्टी सांगण्याचे दान होते.
10त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला.
11त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला, त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे म्हणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्यास यरूशलेम शहरातील यहूदी लोक असेच बांधतील व परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”
12आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले, तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंती केली की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये.
13पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेम शहरामध्ये मरायलादेखील तयार आहे.”
14यरूशलेम शहरापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्यास विनंती करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
15त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरूशलेमे शहरास निघालो.
16कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हास म्नासोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो, तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.
17आम्ही जेव्हा यरूशलेम शहरास पोहचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.
18दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला, तेव्हा सर्व वडीलजन हजर होते.
19पौल त्यांना भेटला, नंतर त्याच्या हातून देवाने परराष्ट्रीय लोकात कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
20जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते त्यास म्हणाले, “बंधू, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वास ठेवणारे झालेत, पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्त्वाचे आहे.
21या यहूदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो.
22मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल.
23तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर; आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे.
24त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करून घे, त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर, मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.
25जे परराष्ट्रीय विश्वास ठेवणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे, ते असे, मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये, रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊ व जारकर्म करू नये.”
26मग पौलानेच त्या चार लोकांस आपल्याबरोबर घेतले, दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला, मग तो परमेश्वराच्या भवनात गेला, शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले, शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.
27सात दिवस जवळ जवळ संपत आले होते, परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला परमेश्वराच्या भवनात पाहिले, त्यांनी लोकांस भडकाविले व पौलाला धरले.
28ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलाच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांस सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे आणि आता त्याने ग्रीक लोकांस देखील परमेश्वराच्या भवनात आणले आहे आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.”
29ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरूशलेम शहरातील पाहिले होते, त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता, लोकांस वाटले, पौलानेच त्यास परमेश्वराच्या भवनात नेले आहे.
30सर्व शहर खवळून उठले, सगळे लोक धावू लागले, त्यांनी पौलाला पकडले व परमेश्वराच्या भवनातून बाहेर ओढून काढले, लगेच दरवाजे बंद करण्यात आली.
31ते त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, सगळ्या यरूशलेम शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.
32ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला, जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.
33मग सरदार पौलाकडे आला व त्यास अटक केली व त्यास साखळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली, मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले.
34गर्दीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले, गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना, म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे.
35जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्यास उचलून आत न्यावे लागले.
36कारण जमाव हिंसक बनत चालला होता, जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा.”
37शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?” तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय?
38मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले ज्या मिसरी मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करून सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस, त्या मिसरी मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.”
39पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सस नगरात राहणारा मी एक यहूदी आहे, मी एका महत्त्वाच्या शहराचा नागरिक आहे, मी तुम्हास विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.”
40जेव्हा सरदाराने त्यास बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांस शांत राहण्यास सांगितले, जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल इब्री भाषेत बोलू लागला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.