इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

प्रेषितांची कृत्ये 18

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला.
2करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते, तो पंत प्रांतातील रहिवासी होता, आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता, पौल त्यांना भेटावयास गेला.
3पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला.
4प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
5जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल यहूदी लोकांस उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला, येशू हाच ख्रिस्त आहे. अशी साक्ष देऊ लागला.
6परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला, त्यास यहूदी लोक वाईट रीतीने बोलले, तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले, तो यहूदी लोकांस म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी निर्दोष आहे, येथून पुढे मी परराष्ट्रीय लोकांकडेच जाईन.”
7पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाचा देवाचा उपासक याच्या घरी गेला.
8त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता, क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.
9एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको, बोलत राहा, शांत राहू नको.
10मी तुझ्याबरोबर आहे, कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”
11म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांस शिकवीत राहिला.
12जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्यास न्यायासनापुढे उभे केले.
13यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांस देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
14पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकांस म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते.
15परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे, त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा, अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो.”
16मग गल्लियोने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले.
17मग त्या सर्वांनी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला न्यायासनासमोर मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.
18पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला, नंतर तो निघाला व सिरीया प्रांताला समुद्रमार्गे गेला आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला ही दोघे होती, पौलाने किंख्रिया शहरात आपल्या डोक्याचे मुंडण केले, कारण त्याने नवस केला होता.
19मग ते इफिस येथे आले, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथे सोडले, तो सभास्थानात गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला.
20जेव्हा त्यांनी त्यास तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही.
21परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.
22जेव्हा पौल कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरूशलेम शहरास गेला आणि मंडळीला भेटला, मग तो खाली अंत्युखियाला गेला.
23तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला, त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
24अपुल्लो नावाचा एक यहूदी होता, तो आलेक्सांद्र शहरात जन्मला होता, तो उच्च शिक्षित होता, तो इफिस येथे आला, त्यास शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.
25परमेश्वराच्या मार्गाचे शिक्षण त्यास देण्यात आले होते, तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्यास फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.
26तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रस्किला व अक्विला ह्यांनी त्यांचे भाषण ऐकूण त्यास जवळ बोलावून घेतले व त्यास देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.
27अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्यास उत्तेजन दिले आणि तेथील येशूच्या शिष्यांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले, जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली.
28जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांस फार जोरदारपणे पराभूत केले आणि पवित्र शास्त्रलेखाच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.