इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

प्रेषितांची कृत्ये 16

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग तो दर्बे व लुस्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता, त्याचा पिता हेल्लेणी होता.
2त्यास लुस्रांतले व इकुन्यातले बंधू नावाजीत होते.
3त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्याठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्यास घेऊन त्यांची सुंता केली; कारण त्याचा पिता ग्रीक आहे हे सर्वांना ठाऊक होते.
4तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता यरूशलेम शहरातील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले.
5ह्यावरून मंडळया विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस वाढत चालल्या.
6नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतीबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले.
7आणि मुसिया प्रांतापर्यंत आल्यावर बिथुनिया प्रांतास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही.
8मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवस शहरास खाली गेले.
9तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की, मासेदोनियात कोणीएक मनुष्य उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हास साहाय्य कर.”
10त्यास असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांस सुवार्ता सांगावयास देवाने आम्हास बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला.
11तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस बेटाला गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस शहरास गेलो.
12तेथून फीलिप्पै शहरास गेलो; ते मासेदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोंकाची वसाहत आहे त्या नगरात आम्ही काही दिवस राहीलो.
13मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हास वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.
14तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची उपासना करणारी होती, तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.
15मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विंनती आम्हास मान्य करावी लागली.
16मग असे झाले की, आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणीएक दुष्ट आत्मा लागलेली मुलगी आम्हास आढळली, तिच्या अंगात येत असे, ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.
17ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे आपणाला तारणाचा मार्ग कळवितात.”
18असे ती पुष्कळ दिवस करीत असे; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या दुष्ट आत्म्याला म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की, तू हिच्यामधून निघून जा.” आणि ते तत्काळ निघून गेले.
19मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अधिकाऱ्यांकडे ओढून नेले.
20आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला त्रास देतात.
21आणि आम्हा रोमन लोकांस जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात.”
22तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली.
23मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेचे नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला.
24त्यास असा हुकूम मिळाल्यावर त्यांने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालू त्यांचे पाय खोडयात अडकवले.
25मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
26तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.
27तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता.
28इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत.
29मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कांपत कांपत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला.
30आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला “साहेब, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहीजे?”
31ते म्हणाले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”
32त्यांनी त्यास व त्याच्या घरांतील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.
33मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या; आणि तेव्हांच त्याने व त्याच्या घरच्या सर्व मनुष्यांनी बाप्तिस्मा घेतला.
34मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या मंडळीने आनंदोत्सव केला.
35दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारास पाठवून सांगितले की, “त्या मनुष्यांना सोडून दे.”
36तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, “तुम्हास सोडावे म्हणून अधिकाऱ्याने माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.”
37परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हास उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे.”
38मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले, तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले.
39मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली.
40मग ते बंदीशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले, बंधुजनांस भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.