इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

तीमथ्याला दुसरे पत्र 2

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.
2माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे.
3ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.
4सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
5जर कोणी मल्ल युद्ध करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्यास मुकुट मिळत नाही.
6कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.
7जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल.
8माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर.
9कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही.
10ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे.
11हे वचन विश्वसनीय आहे की, जर आम्ही त्याच्यासह मरण पावलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू
12जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले, तर तोसुध्दा आम्हास नाकारील
13जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही.
14लोकांस या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुद्ध करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते.
15तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
16पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिकाधिक दूर नेतो.
17आणि अशाप्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हूमनाय आणि फिलेत आहेत,
18ते सत्यापासून दूर गेले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात.
19तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्यास हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे.”
20मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनवलेलीही असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात.
21म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल.
22पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग.
23परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात.
24देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.
25जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.
26आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुद्धीवर येतील.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.