इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 शमुवेल 24

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”
2राजा दावीद सेनापती यवाबाला म्हणाला, “दानपासून बैर-शेबापर्यंत इस्राएलच्या झाडून सर्व वंशातील लोकांची मोजदाद करा, म्हणजे मग मला लोकसंख्या किती आहे ते कळेल.”
3पण यवाब राजाला म्हणाला, “आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हास हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हास असे का करावेसे वाटते?”
4पण राजा दावीदाचे शब्द यवाबाच्या शब्दांपेक्षा प्रभावी ठरले. आणि त्यांनी यवाबाला आणि इतर सैन्याधिकाऱ्यांना इस्राएल प्रजेची मोजदाद करण्यास सांगितले. तेव्हा ते सर्व या कामाला लागले.
5यार्देन ओलांडून त्यांनी अरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.)
6तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होदशी या प्रदेशात गेले. दान्यान आणि तिथून वळसा घेऊन सीदोन येथे गेले.
7सोर (तायर) हा गड आणि हिव्वी व कनानी यांची नगरे इकडे ते गेले. तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेला बैर-शेबा इथपर्यंत गेले.
8सगळा देश पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसानी यरूशलेम येथे पोहोचले.
9यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती.
10हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वरास म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.
11दावीद सकाळी उठला, तेव्हा दावीदाचा संदेष्टा गाद याला परमेश्वराची वाणी प्रकट झाली.”
12परमेश्वर त्यास म्हणाला, “दावीदाला जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, तुझ्यापुढे मी तीन गोष्टी ठेवतो त्यापैकी एकीची निवड कर.”
13गादने दावीदाकडे येऊन त्यास हे सर्व सांगितले. तो दावीदाला म्हणाला, “तिन्हीपैकी एकीची निवड कर. तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा शत्रूंनी तीन महिने तुझा पाठलाग करावा, की तीन दिवस रोगराई पसरावी? विचार कर आणि मी परमेश्वरास काय सांगावे ते सांग.”
14दावीद गादला म्हणाला, “मी पेचात सापडलो आहे खरा! पण परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वरच मला शिक्षा देवो लोकांच्या हाती मी पडू नये.”
15तेव्हा परमेश्वराने इस्राएलवर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळपर्यंत ती राहिली. दानपासून बैर-शेबापर्यंत सत्तर हजार माणसे मृत्युमुखी पडली.
16यरूशलेमेच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला. पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वरास फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.
17लोकांस मारणाऱ्या देवदूताला दावीदाने पाहिले. दावीद परमेश्वरास म्हणाला, “माझे चुकले माझ्या हातून पाप घडले आहे. पण हे लोक मेंढरांसारखे माझ्या मागून आले. त्यांचे काहीच चुकले नाही. तेव्हा तू मला आणि माझ्या कुटुंबियांना शिक्षा कर.”
18त्या दिवशी गाद दावीदाकडे आला. तो म्हणाला, “अरवना यबूसीच्या खळ्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.”
19दावीदाने मग परमेश्वराच्या इच्छेनुसार गादच्या म्हणण्याप्रमाणे केले. तो अरवनाला भेटायला गेला.
20अरवनाने राजाला आणि त्याच्या सेवकांना येताना पाहिले. त्याने पुढे होऊन जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला.
21अरवना म्हणाला, “माझे स्वामी का बरे आले आहेत? दावीद म्हणाला, तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रित्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.”
22अरवना म्हणाला, “स्वामींनी मनाला येईल ते अर्पण करण्यासाठी घ्यावे. होमबलीसाठी हे बैल आहेत. इंधनासाठी मळणीची औते आणि बैलांचे सामान आहे.
23अरवना महाराज, हवे ते मी तुम्हास देईन, महराजांवर परमेश्वराची मर्जी असावी. अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.”
24पण राजा अरवनाला म्हणाला नाही, “तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही.” तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले.
25मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली, होमबली आणि शांत्यर्पणे केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.