इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 शमुवेल 21

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1दावीदाच्या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी रक्तपिपासू घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.”
2गिबोनी म्हणजे इस्राएली नव्हेत ते अमोरी होत इस्राएलींनी त्यांना दुखापत न करण्याचे वचन दिले होते. तरी शौलाने गिबोन्यांच्या वधाचा प्रयत्न केला. इस्राएली आणि यहूदा लोकांविषयीच्या अति उत्साहामुळे त्याने तसे केले गिबोन्यांना एकत्र बोलावून राजा दावीदाने त्यांच्याशी बोलणे केले.
3दावीद त्यांना म्हणाला, “तुमच्यासाठी मी काय करू? इस्राएलाचा कलंक पुसला जाईल आणि तुम्ही या परमेश्वराच्या प्रजेला आशीर्वाद द्याल यासाठी मी काय करू शकतो?”
4तेव्हा गिबोनी दावीदाला म्हणाला, “शौलाच्या घराण्याने जे केले त्याची सोन्यारुप्याने भरपाई होऊ शकत नाही. पण त्यासाठी इस्राएलींना जिवे मारण्याचाही आम्हास हक्क नाही.” दावीद म्हणाला, “ठीक तर तुमच्यासाठी मी आता काय करावे?”
5ते राजाला म्हणाले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला व इस्राएली प्रदेशात राहणाऱ्या आमच्या सर्व लोकांचा नाश करण्याचे ज्याने योजिले होते
6त्या शौलाच्या वंशातले सात मुले आमच्या हवाली कर. शौलाला परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते. म्हणून शौलाच्या गिबा डोंगरावर त्याच्या मुलांना आम्ही देवासमक्षच फाशी देऊ.” राजा दावीद म्हणाला, “मला हे मान्य आहे. त्यांना मी तुमच्या हवाली करतो.”
7पण योनाथानाचा मुलगा मफीबोशेथ याला राजाने अभय दिले. योनाथान हा शौलाचा मुलगा. पण दावीदाने त्यास त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे परमेश्वरास स्मरून वचन दिले होते, म्हणून मफीबोशेथला राजाने इजा पोचू दिली नाही.
8अरमोनी आणि मफीबोशेथ हे शौलाला अय्याची कन्या रिस्पा या पत्नीपासून झालेली अपत्य शौलला मीखल नावाची कन्याही होती. अद्रीएलशी तिचे लग्न झाले होते. महोलाथी येथील बर्जिल्ल्याचा हा पुत्र. या दांपत्याची पाच मुलेही दावीदाने ताब्यात घेतली.
9या सात जणांना त्याने गिबोन्यांच्या स्वाधीन केले. गिबोन्यांनी त्यांना गिबा डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिली. ते सातजण एकदमच प्राणाला मुकले त्यांना ठार केले गेले ते दिवस हंगामाच्या सुरुवातीचे होते. जवाच्या पिकाच्या सुरुवातीचा तो वसंतातील काळ होता.
10अय्याची कन्या रिस्पा हिने शोकाकुल होऊन एक मोठे कापड त्या गिबाच्या खडकावर अंथरले. तेव्हापासून पावसास सुरुवात होईपर्यंत ते तसेच राहू दिले. रिस्पाने रात्रंदिवस त्या मृत देहांची निगराणी केली. दिवसा पक्ष्यांनी आणि रात्री जंगली जनावरांनी त्याचे लचके तोडू नयेत म्हणून राखण केली.
11शौलाची उपपत्नी व अय्याची कन्या रिस्पा काय करत आहे ते लोकांनी दावीदाच्या कानावर घातले.
12तेव्हा दावीदाने याबेश गिलाद मधील लोकांकडून शौल आणि योनाथान यांच्या अस्थी आणवल्या शौल आणि योनाथान यांचा गिलबोवा येथे वध झाल्यावर याबोश गिलादाच्या लोकांनी त्या नेल्या होत्या. बेथ-शान मधील भिंतीवर पलिष्ट्यांनी या दोघांचे देह टांगले होते. पण बेथशानच्या लोकांनी येऊन भरवस्तीतील ती प्रेते चोरून नेली.
13याबेश-गिलाद मधून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान या दोघांच्या अस्थी दावीदाने आणल्या. तसेच त्या फाशी दिल्या गेलेल्या सात जणांचे मृतदेहही आणले.
14शौल आणि योनाथानाच्या अस्थी त्यांनी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे पुरल्या. शौलाचे वडील कीश यांच्या कबरीत त्या पुरल्या राजाच्या आज्ञे बरहुकूम लोकांनी हे सर्व केले. तेव्हा देवाने लोकांची प्रार्थना ऐकली आणि तिला त्याने प्रतिसाद दिला.
15पलिष्ट्यांनी पुन्हा इस्राएलीशी युध्द पुकारले तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर पलिष्ट्यांशी युध्द करायला निघाला. पण यावेळी दावीद फार थकून गेला.
16त्यावेळी तेथे रेफाई वंशातला इशबी-बनोब हा एक बलाढ्य मनुष्य होता. त्याच्या भाल्याचे वजनच तिनशे शेकेल पितळ होते. त्याच्याजवळ नवी कोरी तलवार होती. दावीदाला मारायचा त्याने प्रयत्न केला.
17पण सरुवेचा मुलगा अबीशय याने या पलिष्ट्याला मारले आणि दावीदाचे प्राण वाचवले. तेव्हा दावीदाबरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितले, “तुम्ही आता लढाईवर येऊ नये. नाहीतर इस्राएल एका मोठ्या नेत्याला मुकेल.”
18यानंतर गोब येथे पलिष्ट्यांशी आणखी एकदा लढाई झाली. तेव्हा हूशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातील सफ याचा वध केला.
19गोब येथेच पुन्हा पलिष्ट्यांशी युध्द झाले. तेव्हा बेथलहेमचा यारे ओरगीम याचा मुलगा एलहानान याने गथचा गल्याथ याला ठार केले. विणकराच्या तुरीएवढा त्याचा भाला होता.
20गथ येथे आणखी एक युध्द झाले. तेथे एक धिप्पाड पुरुष होता. त्याच्या हातापायांना सहा सहा, म्हणजे एकंदर चोवीस बोटे होती. हा ही रेफाई वंशातला होता.
21त्याने इस्राएलाला आव्हान दिले पण योनाथानाने या मनुष्याचे प्राण घेतले. हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा.
22ही माणसे गथ येथील रेफाई वंशातील होती. दावीद आणि त्याचे लोक यांनी त्यांना ठार केले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.