इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 शमुवेल 13

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1दावीदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती. ती दिसायला फार सुदंर होती. दावीदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता.
2त्याचे तामारेवर प्रेम होते तामार कुमारिका होती तिच्याशी वावगे वागण्याची त्याची छाती नव्हती. पण तिच्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा होती. तिच्याविषयी विचार करून तो आजारी पडला.
3अम्नोनाला योनादाब नावाचा मित्र होता. दावीदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा. योनादाब धूर्त होता.
4तो अम्नोनाला म्हणाला, दिवसें दिवस तू क्षीण होत चालला आहेस. तू तर राजपुत्र! खायची प्यायची रेलचेल असताना तू असा अशक्त का होत आहेस? माझ्यापाशी मनमोकळे कर. तेव्हा अम्नोन योनादाबाला म्हणाला, माझे तामार वर प्रेम आहे, पण ती माझा सावत्र भाऊ अबशालोमची बहीण आहे.
5योनादाब यावर अम्नोनाला म्हणाला, आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा. मग वडील भेटायला आले की त्यांना सांग, तामारला माझ्याकडे येऊ द्या. तिने मला खायला घालू द्या. माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करू द्या. मग तो तिच्या हातून मी खाईन.
6तेव्हा अम्नोन आजारी असल्याचे भासवून बिछान्यावर झोपून राहिला. राजा दावीद त्याच्या समाचाराला आला. त्यास तो म्हणाला, तामारला माझ्याकडे पाठवा तिला इथे माझ्यादेखत दोन पोळ्या करू द्या आणि मला भरवू द्या. मग मी त्या खाईन.
7दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर.
8तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन याच्याकडे गेली. तो पलगांवरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोळ्या केल्या. अम्नोन हे सर्व पाहत होता.
9पोळ्या तयार झाल्यावर तव्यावरून काढून तिने त्या अम्नोनासाठी ताटात वाढल्या. पण अम्नोन ते काही केल्या खाईना मग आपल्या नोकारांना त्याने बाहेर निघून जाण्याची आज्ञा देऊन तिथून घालवले. सर्व नोकर बाहेर पडले.
10यानंतर अम्नोन तामारेस म्हणाला, ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव. तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली.
11त्यास ती भरवू लागली. तोच त्याने तिचा हात धरला. तिला तो म्हणाला, हे बहिणी, ये आणि माझ्याजवळ झोप.
12तामार त्यास म्हणाली, भाऊ नको! अशी बळजबरी तू माझ्यावर करू नकोस. ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. असल्या भयंकर गोष्टी इस्राएलमघ्ये कदापि घडता कामा नयेत.
13मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल. लोकांच्या दृष्टीने तू इस्राएलामधल्या अनेक मूर्खांपैकी एक ठरशील. तू कृपा करून राजाशी बोल. तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल.
14पण अम्नोनाने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शक्तीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला.
15मग तिच्याबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. पूर्वी त्याचे तिच्यावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा अधिक तो आता तिचा द्वेष करू लागला. त्याने तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितले.
16तामार त्यास म्हणाली, नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस. ते तर तुझ्या या आताच्या कृत्यापेक्षाही वाईट होईल. पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले.
17नोकरांना बोलावून तो म्हणाला, हिला आताच्या आता इथून बाहेर काढा आणि दार बंद करून टाका.
18तेव्हा अम्नोनाच्या नोकराने तिला तेथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. तामरने रंगीबेरंगी, पट्टट्यापट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता. राजकन्या लग्नापूर्वी असा पोषाख करत असत.
19तामारने उद्विग्न मन:स्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करू लागली.
20तेव्हा अबशालोम या तिच्या भावाने तिला विचारले, तू अम्नोनकडे गेली होतीस का? त्याने तुला त्रास दिला का? आता तू शांत हो तो तुझा भाऊ आहे. तेव्हा त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू याचा त्रास करून घेऊ नकोस, यावर तामार काही बोलली नाही. ती शांतपणे अबशालोमच्या घरी राहायला गेली.
21हे सर्व राजा दावीदाच्या कानावर गेले व तो संतापला.
22अबशालोमला अम्नोनाचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनाशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनाने आपली बहिण तामार हिच्याशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.
23दोन वर्षानंतर मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले.
24अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत आपल्या नोकरासहीत येऊन हे दृश्य पाहा.
25तेव्हा राजा दावीद त्यास म्हणाला, मुला आम्ही सर्व जण येणे काही शक्य नाही. तुझ्यावरही त्याचा भार पडेल. अबशालोमने दावीदाची खूप आर्जवे केली. परंतु दावीद गेला नाही. पण त्याने आपले आशीर्वाद दिले.
26अबशालोम म्हणाला, तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा. राजा दावीद म्हणाला, तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे?
27पण अबशालोमने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोमाबरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली.
28अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, अम्नोनावर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत त्यास जेव्हा त्याची नशा चढेल, तेव्हा मी तुम्हास संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करून तुम्ही त्यास ठार करा शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा.
29तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनाला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली.
30राजाचे पुत्र नगराच्या वाटेवर असतानाच राजा दावीदाला या घडामोडीची खबर मिळाली. ती अशी, अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले कोणालाही त्यातून वगळले नाही.
31राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली.
32परंतु दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, सर्व मुले गेली असे समजू नका. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनाने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती.
33स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करून समजू नका. फक्त अम्नोन गेला.
34अबशालोमने पळ काढला. नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता. त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकांस येताना पाहिले.
35तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, बघा मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत.
36योनादाबाचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे आधिकारीही शोक करू लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला.
37दावीद अम्नोनासाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.
38मग अबशालोम गेशूरच्या राजाकडे पळून गेला, तिथे तो तीन वर्षे राहिला.
39राजा दावीद अम्नोनाच्या दु:खातून सावरला, पण अबशालोमच्या आठवणीने तो व्याकुळ होत असे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.