इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 शमुवेल 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग नगरात येऊन दोन दिवस राहिल्यानंतर,
2तिसऱ्या दिवशी, तेथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतील होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. त्याने सरळ दावीदाजवळ येऊन लोटांगण घातले.
3दावीदाने त्यास विचारले, “तू कोठून आलास?” आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले.
4तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे. तो म्हणाला, लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात मरण पावले व शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.”
5दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?”
6यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.
7शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्यास मी दिसलो त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो.
8त्याने माझी चौकशी केली मी अमालेकी असल्याचे त्यास सांगितले.
9तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.’
10त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.”
11हे ऐकून दावीदाला इतके दुःख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याच्या सारखेच केले.
12दुःखाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळपर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक युद्धात मृत्युमुखी पडले याबद्दल त्यांनी शोक केला.
13शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दावीदाने विचारले, “तू कुठला?” यावर तो म्हणाला, “मी अमालेकी असून एका परदेशी मनुष्याचा मुलगा आहे.”
14दावीदाने त्यास विचारले, “परमेश्वराने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?”
15मग दावीदाने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून त्या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.
16दावीद त्यास म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस तू अपराधी आहेस. याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.”
17शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक विलापगीत म्हटले.
18त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.
19“हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले. पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले!
20ही बातमी गथमध्ये सांगू नका. अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करू नका. नाही तर, पलिष्ट्यांच्या त्या कन्या आनंदीत होतील. नाहीतर बेसुंत्याच्या त्या मुलींना आनंद होईल.
21गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली.
22योनाथानाच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले. शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांस वधिले, बलाढ्यांची हत्या केली.
23शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
24इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हास दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
25युध्दात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानाला मरण आले.
26बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते.
27या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले त्यांची शस्त्रे नष्ट झाली.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.