इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

पेत्राचे दुसरे पत्र 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र;
2देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल मिळत राहो.
3देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
4त्यांच्यायोगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत; ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे.
5ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची
6ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात सहनशीलता आणि सहनशीलतेला सुभक्ती,
7आणि सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीती मध्ये प्रीतीची भर जोडा.
8कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निरुपयोगी व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील.
9ज्याच्या ठायी या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे; अदूरदृष्टीचा आहे, त्यास आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे;
10म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही.
11आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल.
12या कारणास्तव, जरी तुम्हास या गोष्टी माहित आहेत आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी तुम्हास त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन.
13मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते.
14कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल.
15आणि माझे निघून जाणे झाल्यानंतरही या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून शक्य तितके करीन.
16कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे ऐश्वर्य, प्रत्यक्ष पाहणारे होतो.
17कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
18त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.
19शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.
20तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही.
21कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.