इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 राजे 6

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हास अपुरी पडते.
2यार्देन नदीवर जाऊन आम्ही एकेकजण एकेक तुळई आणू आणि आपल्यासाठी तिथे राहायला आश्रम बांधावा म्हणून आम्हास परवानगी द्या. अलीशा म्हणाला, जा आणि कामाला लागा.”
3एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.” अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”
4तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि लाकडे तोडायला लागले.
5तुळई तोडत असताना एकाची लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ती उसनी मागून आणली होती.”
6नंतर देवाच्या मनुष्याने विचारले, “ती कोठे पडली?” तेव्हा त्याने, ती जागा दाखवली. तेव्हा अलीशाने मग एक लाकूड तोडून त्या जागी पाण्यात टाकले. त्याबरोबर ते लोखंड पाण्यावर तरंगू लागले.
7अलीशा म्हणाला, “ते उचलून घे.” मग त्याने पुढे हात करून ते उचलले.
8अरामाच्या राजाने इस्राएलाशी लढाई करत असताना त्याने आपल्या सेवकाबरोबर मसलत केली, राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.”
9पण तेव्हा देवाच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा.” त्याठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य चढाई करणार आहे.
10ज्याठिकाणी जाऊ नकोस असा देवाच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठवला होता, तेथे त्याने आपली माणसे पाठवली. असा आपला बचाव त्याने एकदोनदा नाहीतर अनेकदा केला होता.
11यावरुन अरामाच्या राजाला संताप आला. त्याने पुन्हा आपल्या सेवकांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.”
12तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, “स्वामी, कोणीही हेर नाही, पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्राएलाचा तो संदेष्टा अलीशाच त्यांच्या राजाला सांगतो.”
13तेव्हा अरामाचा राजा म्हणाला, “कोठे आहे तो अलीशा. त्यास पकडायला मी माणसे पाठवतो!” तेव्हा अरामाच्या राजाच्या सेवकांनी तो दोथानमध्ये असल्याचे सांगितले.
14मग अरामाच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला.
15देवाच्या मनुष्याचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथ व घोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले. अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करावे?”
16अलीशा म्हणाला, “घाबरु नको! त्याच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे!”
17आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्यास नीट दिसेल.” परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्यास अलीशाच्या भोवती अग्नीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.
18हे अग्नीरथ आणि अग्नीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करून म्हटले, “तू या लोकांस आंधळे करून टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.” अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले.
19अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हास हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमाग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो मनुष्य मी तुम्हास दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.
20ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.” परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनामध्ये असल्याचे कळले.
21इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?”
22अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.
23इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणेपिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याच्या टोळ्या इस्राएलावर आल्या नाहीत.”
24यानंतर, अरामाचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला.
25त्यामुळे शोमरोनामध्ये महगाई वाढली. गाढवाचे मुंडके ऐंशी रुपयांना आणि कबुतराची पावशेर विष्ठा पांच रुपयांना विकली जाऊ लागली.
26इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन फिरत होता. तेव्हा एका स्त्रीने त्यास मोठ्याने ओरडून म्हटले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरून मला मदत करा!”
27इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाहीतर मी तुला कोठून मदत करु? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”
28मग राजाने तिची विचारपूस केली. ती म्हणाली, “ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्यास मारुन खाऊ मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ.
29तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्यास आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”
30स्त्रीचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की त्याने आपले कपडे फाडले. तो तेथून पुढे गेला तेव्हा त्याने गोणताट घातलेले लोकांनी पाहिले
31राजा म्हणाला, “आज दिवस मावळेपर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!”
32राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडिलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांस म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा त्यास लोटून दार लावून घ्या. त्याच्या मागोमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहुल मला लागली आहे!”
33अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्याजवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहावी?”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.