इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 राजे 4

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आता संदेष्ट्यांच्या मुलांच्या बायकांतली एक अलीशाकडे रडत आली, आणि म्हणाली, “तुझा सेवक माझा पती मरण पावला आहे, आणि तुला माहित आहे की, तुझा सेवक परमेश्वराचे भय राखत होता. पण आता सावकार माझ्या दोन मुलांना त्याचा गुलाम करून घ्यायला नेण्यासाठी आला आहे.”
2तेव्हा अलीशा तिला म्हणाला, “मी तुला काय मदत करु शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग.” तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर तुझ्या दासीच्या घरात काहीच नाही.”
3तेव्हा अलीशा म्हणाला, “आता जा आणि तुझ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसने मागून आण. जितके शक्य होतील तितके उसने आण.
4मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एकाबाजूला ठेव.”
5मग ती स्त्री अलीशाकडून निघून आपल्या घरी आली व तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार आतून लावून घेतले. त्यांनी तिच्याकडे भांडी आणली आणि ती त्यामध्ये तेल ओतत गेली.
6अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.” पण तो तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले.
7मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या मनुष्यास हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल विक आणि कर्जफेड कर, आणि उरलेल्या पैशावर तू आपल्या मुलांचा निर्वाह कर.”
8एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा तिकडून जाई तेव्हा त्या स्त्रीकडे जेवणासाठी थांबत असे.
9तेव्हा ती स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा, मला आता कळाले आहे की, आपल्या येथे नेहमी येतो तो अलीशा, परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे.
10तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या, त्यामध्ये एक पलंग, मेज व बैठक आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्यास थांबायला ही खोली होईल.”
11मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला.
12तेव्हा अलीशाने आपला सेवक गेहजी याला, “त्या शूनेमच्या स्त्रीला बोलावून आणायला सांगितले.” त्याप्रमाणे गेहजीने त्या स्त्रीला बोलावले, ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली.
13अलीशा त्यास म्हणाला, तिला सांग की, “तू आमची चांगली काळजी घेतली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? तुझ्यासाठी राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?” ती म्हणाली, “मी माझ्या लोकांमध्ये राहते.”
14तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “मग आपण तिच्यासाठी काय करु शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला खरोखर मूलबाळ नाही आणि तिचा पती वृध्द आहे.”
15मग अलीशा म्हणाला, “तिला बोलाव” गेहजीने पुन्हा तिला बोलावले, तेव्हा ती येऊन दाराशी उभी राहिली.
16अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या मुलाला उराशी धरशील.” ती म्हणाली, “नाही, माझ्या स्वामी, तुम्ही परमेश्वराचे मनुष्य आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.”
17पण ती स्त्री गरोदर राहिली आणि अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंत ऋतूच्या वेळी तिने मुलाला जन्म दिला.
18मुलगा मोठा झाल्यावर, एके दिवशी तो आपल्या बापाजवळ जो कापणी करणाऱ्यां लोकांस सोबत होता तेथे गेला.
19तो वडिलांना म्हणाला, “माझे डोके, माझे डोके.” यावर त्याचे वडिल आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”
20नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला.
21तेव्हा त्या स्त्रीने आपल्या मुलाला परमेश्वराच्या मनुष्याच्या पलंगावर ठेवले व खोलीचे दार लावून ती बाहेर गेली.
22तिने नवऱ्याला हाक मारुन म्हटले, “कृपाकरून एक नोकर आणि एक गाढव माझ्याकडे पाठव, म्हणजे मी ताबडतोब जाऊन परमेश्वराच्या मनुष्यास भेटून येते.”
23त्या स्त्रीचा पती तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे का जातेस? आज चंद्रदर्शन नाही, की शब्बाथही नाही.” ती म्हणाली, “सगळे ठीक होईल.”
24मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता पटकन चल आणि मी सांगितल्या शिवाय माझ्यासाठी वेग कमी करु नको!”
25मग ती निघून कर्मेल डोंगरास परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले, तेव्हा त्याने गेहजी या आपल्या नोकराला म्हटले, “बघ, ती शूनेमची स्त्री येत आहे.
26कृपाकरून तिला भेटायला धावत जा आणि तिला विचार, तू व तुझा पती, तुझा मुलगा, हे सर्व ठीक आहेत ना?” ती म्हणाली, सर्वकाही ठीक आहे.
27आणि तिने डोंगरावर देवाच्या मनुष्याजवळ जाऊन त्याचे पाय धरले. तेव्हा तिला ढकलण्यास गेहजी जवळ आला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला एकटे सोड, ती काळजीत आहे. परमेश्वराने हिची समस्या माझ्यापासून लपवली आहे, मला काहिच कळवले नाही.”
28तेव्हा ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुझ्याजवळ मुलगा मागितला होता काय? ‘मला फसवू नको’ असे मी म्हटले नव्हते काय?”
29तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “निघायची तयारी कर व तुझ्या हातात माझी काठी घे, आणि तिच्या घरी जा. जर तुला कोणी भेटला तर त्यास सलाम करू नको, आणि कोणी तुला सलाम केला तर त्यास उत्तर देऊ नको. आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.”
30पण मुलाच्या आईने म्हटले, “परमेश्वराची आणि तुमची शपथ मी तुम्हास सोडणार नाही!” तेव्हा अलीशा उठला आणि तिच्या मागून निघाला.
31गेहजी त्यांच्या आधी घरी जाऊन पोहचला व त्याने त्या मुलाच्या तोंडावर काठी ठेवली पण ते मूल काही बोलले नाही किंवा कोणतीच हालचाल केली नाही. तेव्हा गेहजी परत अलीशाकडे गेला व त्यास म्हणाला, “मूल काही जागे झाले नाही.”
32जेव्हा अलीशा घरात आला ते मूल मरण पावलेले व त्याच्या अंथरुणावर निपचीत पडले होते.
33अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघेच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली.
34अलीशा त्या मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर, आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलीशाने त्या मुलावर पाखर घातल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली.
35मग अलीशा उठला आणि घरात इकडेतिकडे फिरला. मग पुन्हा वर येऊन मुलावर पाखर घातली. मुलाला एका पाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले.
36अलीशाने गेहजीला हाक मारुन त्या शूनेमकरिणीला बोलवण्यास सांगितले. त्याने तिला बोलविल्यावर ती खोलीत आल्यावर, अलीशा तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला उचलून घे.”
37मग तिने जमिनीपर्यंत पालथे पडून त्यास नमन केले व मुलाला उचलून घेऊन बाहेर आली.
38अलीशा गिलगाल येथे परत आला. तेव्हा त्या देशात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचे शिष्य त्याच्यासमोर बसले होते. तो आपल्या सेवकाला म्हणाला, “एक मोठे पातेले अग्नीवर ठेव आणि या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”
39त्यातील एकजण रानात शाकभाजी गोळा करून आणावयास गेला. तेव्हा त्यास एक रानवेल दिसला व त्याची फळे तोडून आपल्या ओटीत भरून, त्याने ती फळे कापून भांड्यात टाकली. परंतु ती कडू होती हे त्यांना माहित नव्हते.
40मग ही शाकभाजी सर्वांना खाण्यासाठी वाढली. ती खाताच सर्वजण ओरडून म्हणाले. “देवाच्या मनुष्या, या भांड्यात तर मरण आहे.” त्यांना ते खाता येईना.
41तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” पीठ आणून दिल्यावर त्याने ते मोठ्या भांड्यात घातले. मग अलीशा म्हणाला, “आता हे सगळ्यांना वाढा.” आता त्यामध्ये काही अपायकारक राहिले नाही.
42बआल-शालीश येथून एकदा एक मनुष्य आपल्या नव्या पिकातील जवाच्या वीस भाकरी देवाच्या मनुष्यासाठी घेऊन आला. तसेच कोवळी कणसे पोत्यातून घेऊन आला. तो म्हणाला, “हे सर्व या लोकांस खायला दे.”
43त्याचा सेवक म्हणाला, “शंभर मनुष्यांना हे कसे पुरणार?” पण अलीशा म्हणाला, “तू ते सर्वांना वाटून दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर त्यातून काही उरेल.”
44मग त्याच्या सेवकाने त्यांच्यासमोर ते अन्न ठेवले. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्यावरही काही उरलेच.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.