इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 राजे 25

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1सिद्कीयाने बाबेलाच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरूशलेमेवर चाल करून गेला. सिद्कीयाच्या कारकिर्दीचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा देऊन लोकांचे येणे जाणे रोखले. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले.
2सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत या नगराला वेढा चालू राहिला.
3दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य मनुष्याची अन्नान्नदशा झाली.
4मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.
5खास्दी सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्यास एकटा सोडून पळून गेले.
6बाबेल देशाच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले.
7त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास जेरबंद करून बाबेलला नेले.
8बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबूजरदान यरूशलेमेवर चाल करून आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता.
9या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरूशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले.
10मग खास्दी सैन्याने यरूशलेमची तटबंदी पाडली.
11नगरात अजून असलेले लोक बाबेलाच्या राज्याकडे फितून गेलेले लोक व उरलेले लोक यांना गारद्यांचा नायक नबूजरदानाने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले.
12अगदीच दरिद्री लोकांस तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले.
13परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची खास्दी सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करून ते पितळ त्यांनी बाबेलला नेले.
14इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली.
15अग्नीपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली.
16अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू दोन पितळी स्तंभ. एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या, यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते.
17प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती, दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते.
18नबुजरदानने लोकांस मंदिरातून खाली नेले व मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल
19आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली.
20बाबेलातील रिब्ला येथे नबूजरदानाने या सर्वांना राजासमोर हजर केले.
21बाबेलाच्या राजाने त्या सर्वांची हमाथ देशातील रिब्ला येथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदी यांना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.
22बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने काही लोकांस यहूदातच राहू दिले. त्यामध्ये एकजण होता त्याचे नाव गदल्या. हा अहीकामचा मुलगा आणि अहीकाम शाफानचा. या गदल्याला नबुखद्नेस्सरने यहूदा प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले.
23नथन्याचा मुलगा इश्माएल, कारेहाचा मुलगा यहोहानान आणि नटोफाथी तन्हुमेथाचा मुलगा सराया व माकाथीचा मुलगा याजन्या हे सैन्यातील सरदार होते. त्यांनी बाबेलाच्या राजाने गदल्याला अधिकारी केल्याचे ऐकले म्हणून ते त्यास भेटायला मिस्पा येथे आले.
24गदल्याने त्या सर्वांना शपथ दिली आणि तो त्यांना म्हणाला, “खास्दी अधिकाऱ्यांचे भय बाळगू नका. या देशातच राहून बाबेलाच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचे भले होईल.”
25अलीशामचा मुलगा नथन्या याचा मुलगा इश्माएल हा राजसंतानांपैकी होता. त्याने आणखी दहाजणांसमवेत सातव्या महिन्यात गदल्यावर हल्ला केला आणि सर्व यहूदी तसेच खास्दी यांना मिस्पा येथे ठार केले.
26मग सर्व सैन्याधिकारी आणि लोक मिसरला पळून गेले. खास्दी लोकांच्या धास्तीने कनिष्ठ पदावर असलेल्यापासून श्रेष्ठ पदावर असलेल्यांपर्यंत सर्व पळाले.
27पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनाला तोपर्यंत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले.
28त्याच्याशी त्याने चांगले बोलून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्याने त्यांच्याहून त्यास दरबारात उच्चासन दिले.
29अबील मरोदखने त्यास तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे.
30अबील मरोदख राजाने त्यास पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.