इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 राजे 18

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आणि एलाचा मुलगा होशे, जो इस्राएलाचा राजा, याच्या तिसऱ्या वर्षी यहूदाचा राजा आहाज याचा मुलगा हिज्कीया राज्य करू लागला.
2हिज्कीया पंचवीस वर्षाचा होता जेव्हा तो राज्य करू लागला. आणि त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी. ही जखऱ्याची मुलगी होती.
3परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले ते तो करीत असे, आपला पूर्वज दावीद करीत असे त्याप्रमाणे हिज्कीयाही सर्वकाही करत असे.
4त्याने उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट करून टाकली. तसेच स्मृतीस्तंभ, आणि अशेराचे खांबही तोडून टाकले. त्याने मोशेने केलेल्या पितळी सापाचे तुकडे केले कारण त्या दिवसांमध्ये इस्राएलाचे लोक त्यास धूप जाळत असत. ते त्यास “नहुश्तान” असे म्हणत.
5इस्राएलचा देव परमेश्वर ह्यांच्यावर हिज्कीयाने भरवसा ठेवला होता, म्हणून त्याच्यासारखा राजा यहूदाच्या राजांमध्ये त्याच्याआधी किंवा त्याच्यानंतरही झाला नाही.
6तो परमेश्वरास धरून राहिला. त्यास अनुसरण्याचे त्याने सोडले नाही परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे त्याने पालन केले.
7म्हणून परमेश्वर त्याच्यासोबत होता, आणि जिकडे तो जाई तिथे त्याची उन्नती होई. त्याने अश्शूरच्या राजाविरुध्द बंड केले व त्यांची सेवा केली नाही.
8त्याने गज्जा आणि त्याच्या सीमेपर्यंत पलिष्ट्यांचा पराभव केला. त्याने पहारेकऱ्यांच्या बुरूजा पासून तटबंदीच्या नगरापर्यंत त्यांना मारले.
9आणि हिज्कीया राजाच्या चौथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा, एलाचा मुलगा होशे ह्याच्या सातव्या वर्षी, असे झाले की अश्शूराचा राजा शल्मनेसर हा शोमरोनावर चढून आला व त्यास वेढा घातला.
10तीन वर्षांच्या अखेरीस त्याने ते घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. अर्थातच इस्राएलचा राजा एलाचा मुलगा होशे याच्या नवव्या वर्षी त्यांनी शोमरोन घेतले.
11मग अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांस कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे, गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य नगरांमध्ये ठेवले.
12त्यांनी असे केले कारण इस्राएल लोकांनी परमेश्वर त्यांचा देव, ह्याचा शब्द पाळला नाही. तर त्याच्या कराराचा भंग केला, म्हणजे परमेश्वराचा सेवक मोशे याने जे आज्ञापिलेले होते ते त्यांनी जुमानले नाही व त्याची शिकवण ऐकली नाही.
13हिज्कीया राजा ह्याच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व तटबंदी नगरांवर हल्ला चढवून त्यांचा ताबा घेतला.
14तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूराच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला की, “माझ्याकडून अपराध झाला आहे, तर आता माझ्या पासून निघून जा. तू जे माझ्यावर लादशील ते मी सहन करीन.” यावर अश्शूराच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला तिनशे किक्कार चांदी व तीस किक्कार सोने अशी खंडणी मागितली.
15तेव्हा हिज्कीयाने परमेश्वराच्या घरात व राजाच्या राजवाड्यातील भांडारात असणारी सर्व चांदी त्यास दिली.
16मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि सोन्याच्या पल्याने मढवलेले खांब काढून घेतले आणि अश्शूरच्या राजाला हे सोने दिले.
17पण अश्शूरच्या राजाने तर्तान व रब-सारीस व रब-शाके यांना मोठ्या सैन्यासोबत लाखीशाहून यरूशलेमामध्ये हिज्कीया राजा कडे पाठवले. तेव्हा ते यरूशलेमेस चढून आले, आणि वरच्या तलावाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या रस्त्यावर उभे राहिले.
18त्यांनी राजाला निरोप पाठवला तेव्हा, हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी, व शेबना चिटणीस आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटावयास पुढे आले.
19तेव्हा रबशाके त्यांना म्हणाला, “अश्शूराचा महान राजा हिज्कीयास काय म्हणतो हे सांगा; तुझ्या आत्मविश्वासाविषयी कसली शिष्टता बाळगतोस?
20तू म्हणतोस, लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य तुझ्याजवळ आहेत, परंतू ते केवळ पोकळ व अर्थहीन शब्द आहेत. आता तू कोणावर भरवसा ठेवतोस. माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोणी धैर्य दिले आहे?
21पाहा, तू ठेचलेल्या बोरूच्या काठीवर म्हणजे मिसर देशावर भरवसा ठेवतोस, अशा काठीवर कोणी मनुष्य विसंबून राहिला तर ती मोडून पडेल व हातात रुतेल. जे कोणी मिसराचा राजा फारो ह्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना तो तसाच आहे.
22तू कदाचित् असे म्हणशील, आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो. पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या आणि यहूदा व यरूशलेमेला म्हटले की, फक्त यरूशलेममधील याच वेदीपुढे आराधना करावी तोच तो आहे की नाही?
23तर आता अश्शूराचा राजा माझा धनी याच्यावतीने, तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर तुला दोन हजार घोडे देण्याचा चांगला प्रस्ताव मांडतो.
24माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार का? रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.
25मी यरूशलेमचा संहार करायला चाल करून आलोय, तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय आलो काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर स्वारी करून त्याचा पूर्ण पाडाव कर.”
26तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “तू आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल. आम्हास ती भाषा कळते. आमच्याशी यहूदी भाषेत बोलू नको. कारण तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”
27पण रब-शाके त्यांना म्हणाला, “प्रभूने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही, तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वत:चे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.”
28मग रब-शाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूराचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका”
29राजा असे म्हणतो, हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हास वाचवू शकणार नाही.
30तो म्हणतो परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हास सांगतो, परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूराचा राजा आपल्या शहराचा पराभव करु शकणार नाही.
31पण हिज्कीयाचे ऐकू नका. “कारण अश्शूराचा राजा म्हणतो माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हास खायला मिळतील. स्वत:च्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल.
32पुढे मी तुमच्या देशासारख्याच दुसऱ्या देशात, धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्याचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यामध्ये मी तुम्हास घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे हृदयपरिवर्तन करु पाहत आहे, ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.
33इतर दैवतांनी आपले देश अश्शूराच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.
34कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवतं? सफरवाईम, हेना, इव्वा यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का?
35इतर राष्ट्राच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याकडून परमेश्वर यरूशलेम वाचवणार का?”
36पण लोक गप्पच होते. ते सेनापतीला काहीही बोलले नाहीत. कारण “त्यांनी काहीही उत्तर द्याचये नाही” अशी राजा हिज्कीयाची त्यांना आज्ञा होती.
37हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, जो राजवाड्याचा कारभारी, व चिटणीस शेबना आणि आसाफचा मुलगा यवाह हा नोंदी करणारा होता हे शोकाकुल होऊन आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले. अश्शूराचा सेनापती रब-शाके काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.