इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र 13

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मी आता तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल.
2ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसर्‍या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते आणि दुसर्‍या वेळी स्वतः आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की, मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही.
3कारण माझ्याद्वारे ख्रिस्त बोलतो ह्याचे प्रमाण तुम्हास पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने दुर्बळ नाही पण तुमच्यात समर्थ आहे.
4कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.
5तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हास आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
6मी आशा करतो की, आम्ही पसंतीस न उतरलेले नाही हे तुम्ही ओळखाल.
7आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही स्वीकृत दिसावे म्हणून नाही, पण आम्ही स्वीकृत नसलो तरी तुम्ही चांगले ते करावे.
8कारण आम्ही सत्याविरुद्ध काही करत नाही, तर सत्यासाठी करतो.
9जेव्हा आम्ही दुर्बळ आहोत व तुम्ही बलवान आहात तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.
10एवढ्याकरता दूर असताना मी या गोष्टी लिहीत आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून, मी तेथे असताना कडकपणाने वागू नये.
11शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.
12पवित्र अभिवादनाने एकमेकांना सलाम करा.
13तुम्हास सर्व पवित्रजन सलाम सांगतात.
14प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.