इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 इतिहास 35

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1राजा, योशीयाने यरूशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला.
2परमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले.
3इस्राएली लोकांस शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी पवित्र होणाऱ्या लेव्यांना योशीया म्हणाला, “दावीद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करार कोश ठेवा. दावीद इस्राएलचा राजा होता. यापुढे पवित्र करारकोश वारंवार खांद्यावरुन वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्राएलचे लोक त्यांची सेवा करा.
4आपआपल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिध्द व्हा. इस्राएलाचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपआपली कर्तव्ये पार पाडा.
5आपआपल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हास आपापसात सहकार्य करता येईल.
6वल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वत:चे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेद्वारे दिल्या आहेत.”
7वल्हांडणासाठी योशीयाने तीस हजार शेरडेमेंढरे जे तेथे उपस्थित होते त्यांना यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांस दिली; याखेरीज तीन हजार दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते.
8या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांस, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे देवाच्या मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे आणि तीनशे बैल एवढे पशू वल्हांडणाचे बली म्हणून याजकांना दिले.
9कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले, कोनन्या इत्यादी मंडळी लेव्याची प्रमुख होती.
10वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती.
11वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. लेवींकडून मिळालेले हे रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले.
12त्यांनी मग हे बैल परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचा होता.
13लेवींनी वल्हांडणाच्या यज्ञपशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यात, हंड्यांत आणि कढई मध्ये त्यांनीही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकांस ती नेऊन दिली.
14हे काम उरकल्यावर लेवींना स्वत:साठी आणि अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते.
15आसाफच्या घराण्यातील लेवी गायक राजा दाविदाने नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर उभे होते. आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून हे ते होत. प्रत्येक प्रवेशद्वारावरील द्वारपालांना आपले काम सोडायची गरज नव्हती कारण त्यांच्या लेवी बांधवांनी वल्हांडणाच्या सणाची त्यांच्यासाठी करायची सगळी तयारी केली होती.
16तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले.
17सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला.
18शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलातून आलेले लोक आणि यरूशलेमची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला.
19योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.
20योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो, फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढावयास सैन्यासह चालून आला. योशीया त्यास लढाईसाठी सामोरा गेला.
21पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्यास कळवले की, यहूदाच्या राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील.
22पण योशीया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले. आणि वेष पालटून तो लढाईत उतरला. देवाच्या आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशीयाने ऐकले नाही. तो मगिद्दोच्या खोऱ्यात युध्दासाठी सज्ज झाला.
23या लढाईत योशीयावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा.
24तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरूशलेमेला नेले. यरूशलेमेमध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांस फार दु:ख झाले.
25यिर्मयाने योशीया प्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते निरंतर गाण्याचा त्यांनी ठरावच केला. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.
26योशीयाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमानेची चांगली कृत्ये
27म्हणजे त्याची सर्व इतर कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.