इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 इतिहास 32

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करून आला. नगराच्या तटबंदी बाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करून ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला.
2यरूशलेमेवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले.
3तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करून राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्यास मदत केली.
4झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर त्यास मुबलक पाणी का मिळावे?”
5हिज्कीयाने पुढील उपाययोजनेने यरूशलेमची मजबुती वाढवली. तटबंदीची भिंत ज्याठिकाणी ढासळली होती तिथे बांधून काढली. भिंतीवर बुरुज बांधले. तटबंदी बाहेर दुसरा मजबूत कोट केला. दावीद नगरातील मिल्लो नावाच्या बूरूजाची मजबूती केली. शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या.
6हिज्कीयाने प्रजेवर सेना नायकांच्या नेमणुका केल्या, आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली.
7हिज्कीया त्यांना म्हणाला, “हिंमत बाळगा आणि द्दढ राहा. अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका. आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे.
8अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला तर साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे यहूदाचा राजा हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला.
9अश्शूरचा राजा सन्हेरीब याने लाखीशाचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यासह लाखीश नगराजवळ तळ दिला होता. तेथून त्याने यहूदाचा राजा हिज्कीया आणि यरूशलेममधील यहूदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला.
10सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. यरूशलेमेला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता?”
11हिज्कीयाचा हा तुम्हास फसवण्याचा डाव आहे. यरूशलेमामध्ये अडकून तुम्ही तहानभुकेने व्याकुळ होऊन मरावे असा त्याचा अंतताः हेतू आहे. तो तुम्हास म्हणतो, “अश्शूरच्या राजापासून आपला देव परमेश्वर आपले रक्षण करील.”
12पण त्यानेच परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या. तुम्हा यहूदी आणि यरूशलेमेच्या लोकांस त्याने सांगितले की तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे.
13माझ्या पूर्वजांनी आणि मी इतर देशांतल्या लोकांची कशी अवस्था करून टाकली ती तुम्हास माहीत आहे. त्या देशांतले दैवते काही आपल्या लोकांस वाचवू शकले नाहीत. मलाही ते त्यांचा नाश करण्यापासून परावृत्त करु शकले नाहीत.
14माझ्या पूर्वजांनी इतर देशांचा नाश केला. त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकांस विनाशातून सोडवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तरी तुम्हास माझ्या सामर्थ्यापासुन वाचवू शकेल असे वाटते का?
15हिज्कीयाच्या बतावणीला बळी पडू नका व त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. आमच्या पासून आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात कोणत्याच राष्ट्राच्या दैवताला अद्यापि यश आलेले नाही. तेव्हा तुमचा संहार करण्याला तुमचे दैवत माझ्या हातून तुम्हास वाचवू शकेल असे समजू नका.
16अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली.
17सन्हेरीबनच्या दासांनी पत्रांमध्ये इस्राएलाचा देव परमेश्वर याविषयी अपमानकारक मजकूरही लिहिला. तो असा होता. “इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही. तसेच हिज्कीयाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही.”
18मग अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरूशलेमेच्या लोकांस घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला. असे करून यरूशलेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता.
19जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हांतानी बनवीलेल्या मुर्तीच्या व यरूशलेमेच्या परमेश्वरासही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले.
20यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा पुत्र यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करून मोठ्याने प्रार्थना केली.
21तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या पुत्रांना तलवारीने त्याने ठार केले.
22अशाप्रकारे परमेश्वराने अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिज्कीया आणि यरूशलेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वरास हिज्कीयाची आणि यरूशलेमेच्या प्रजेची काळजी होती.
23बऱ्याच जणांनी परमेश्वरास वाहण्यास भेटवस्तू यरूशलेमेत आणल्या. यहूदाचा राजा हिज्कीया याच्यासाठी ही नजराणे आणले. या घटनेपासून सर्व राष्ट्रांना हिज्कीयाबद्दल आदर वाटू लागला.
24या काळातच हिज्कीयाला आजारपणाने घेरले आणि तो मरणासन्न झाला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर त्याच्याशी बोलला याप्रकारे परमेश्वराने त्यास एक संकेत दिला.
25पण हिज्कीयाला गर्व वाटू लागला होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल त्यास धन्यवाद दिले नाहीत. या गोष्टीमुळे हिज्कीयावर आणि यहूदा व यरूशलेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला.
26परंतु यरूशलेमेचे लोक आणि हिज्कीया यांचे हृदयपरिवर्तन झाले आणि त्यांची वर्तणूक बदलली. त्यांच्यात नम्रता आली. त्यामुळे हिज्कीयाच्या हयातीत परमेश्वराचा रोष त्यांच्यावर ओढवला नाही.
27हिज्कीयाची भरभराट झाली, त्यास मान सन्मान मिळाला. चांदी, सोने, किंमती रत्ने, मसाल्याचे पदार्थ, ढाली इत्यादी नाना तऱ्हेच्या वस्तू ठेवण्यासाठी त्याने कोठारे केली.
28धान्य, नवीन मद्य, तेल या लोकांकडून आलेल्या गोष्टी ठेवायलाही कोठारे बांधली, गुरेढोरे आणि मेंढ्या आपल्या कळपासाठी कोंडवाडे बांधले.
29हिज्कीयाने नवीन नगरे वसवली. सर्व तऱ्हेचे पशू आणि मेंढरे यांचे कळप त्याच्याकडे होते. देव दयेने हिज्कीयाला समृध्दी आली.
30याच हिज्कीयाने गीहोनचा यरूशलेम मधला वरचा प्रवाह अडवून त्यास दावीद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिज्कीयाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले.
31एकदा देशात घडलेल्या चमत्कारांविषयी चौकशी करायला बाबेलच्या अधिपतींनी त्याच्याकडे राजदूत पाठवले. तेव्हा हिज्कीयाची पारख करावी आणि त्याचे मन जाणून घ्यावे म्हणून देवाने त्यास एकटे सोडले.
32हिज्कीयाने केलेल्या इतर गोष्टी आणि त्याचा लोकांविषयीचा दयाळूपणा, त्याची धार्मिक कृत्ये, त्याची परमेश्वरा प्रती एकनिष्ठा याविषयी आमोजचा पुत्र यशया संदेष्टा याचे दृष्टांत आणि यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे.
33हिज्कीया मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दाविदाच्या वंशजांच्या कबरीपाशी उंच भागावर लोकांनी त्याचे दफन केले. हिज्कीया मरण पावला तेव्हा यहूदा आणि यरूशलेममधील लोकांनी त्यास सन्मानपूर्वक निरोप दिला. हिज्कीयाच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे गादीवर आला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.