इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 इतिहास 16

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.
2तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारातून व राजमहालातून सोने आणि चांदी काढून घेतली. अरामाचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहत होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्यास निरोप पाठवला,
3“आपण आपसात एक करार करू आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
4बेन-हदाद आसाच्या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल-मईम या नगरांवर हल्ला केला कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली.
5या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले.
6राजा आसाने मग सर्व यहूदी लोकांना बोलावले. बाशा ने रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
7यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
8कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.
9अखिल पृथ्वीवर परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करीत असतात जे कोणी सरळ मनाने त्याच्याशी वर्ततात अशांना तो आपले पाठबळ देतो. पण तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.”
10द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.
11आसाची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.
12आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला.
13आपल्या कारकिर्दीच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आसा मरण पावला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.
14दावीद नगरात त्याने आधीच स्वत:साठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्यास ठेवले. त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.