इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

तीमथ्याला पहिले पत्र 3

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1हे वचन विश्वसनीय आहेः जर कोणी अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो.
2तर अध्यक्ष हा निर्दोष, एका पत्नीचा पती, मिताचारी, सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण, असा असावा.
3तो मद्य पिणारा किंवा मारका (किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा) नसावा तर तो सौम्य, न भांडणारा, पैशाचा लोभ न धरणारा.
4आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा.
5जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?
6तो या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये.
7त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये.
8त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी.
9देवाने जे आम्हास प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सखोल सत्य त्यांनी शुद्ध विवेकाने धरून ठेवावे.
10वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग निर्दोष ठरल्यास, त्यांनी सेवकपण करावे.
11त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.
12प्रत्येक सेवक एका पत्नीचा पती असावा आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी.
13कारण ज्यांनी सेवकपण चांगले केले, ते आपणास चांगली पदवी आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासांत फार धैर्य मिळवतात.
14मी तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहिल्या आहे.
15तरी मला उशीर लागल्यास, देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
16सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे तो देहात प्रकट झाला, आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रांमध्ये गाजवला गेला, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.