इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 शमुवेल 8

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1जेव्हा शमुवेल म्हातारा झाला तेव्हा त्याने आपले पुत्र इस्राएलावर न्यायाधीश नेमले.
2त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायाधीश होते.
3परंतु त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नसत, तर ते अप्रामाणिक लाभांच्या पाठीमागे लागले होते. ते लाच घेऊन विपरीत न्याय करीत असत.
4मग इस्राएलाचे सर्व वडील जमून रामा येथे शमुवेलाकडे आले.
5आणि ते त्यास म्हणाले, “पाहा तुम्ही वयोवृद्ध झाले आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत. आता सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमा.”
6परंतु, “आमचा न्याय करायला आम्हांला राजा द्या,” असे जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. म्हणून शमुवेलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली.
7तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “लोक सांगतात त्या सर्वबाबतीत तू त्यांचा शब्द ऐक; कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मला नाकारले आहे.
8मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे, मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली, आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे.”
9तर आता त्यांचे ऐक; तथापि तू त्याच्याशी खडसावून बोल आणि जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग.
10मग शमुवेलाने, ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना, परमेश्वराची सर्व वचने सांगितली.
11तो त्यांना म्हणाला, “जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे पुत्र घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील.
12तो त्यांना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील. जमीन नांगरायला, आपली पिके कापायला, आणि आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील.
13तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल.
14तुमची जी उत्तम ती शेते, तुमचे द्राक्षमळे, आणि तुमचे जैतूनाचे मळे घेऊन, ते तो त्याच्या चाकरांना देईल.
15तो तुमची पीके व तुमचे द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन, तो आपल्या कारभाऱ्यांना देईल.
16तुमचे दास आणि तुमच्या दासी व तुमचे उत्तम तरुण व तुमची गाढवे घेऊन, ते तो आपल्या कामाला लावील.
17तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल.
18त्यानंतर तुम्ही आपणासाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल; परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही.”
19पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, “असे नाही! आम्हांवर राजा पाहिजेच
20म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हापुढे चालून आमच्या लढाया लढेल.”
21शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले;
22मग तेव्हा परमेश्वर शमुवेलाशी बोलला, “तू त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव.” तेव्हा शमुवेल इस्राएलाच्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकजण आपापल्या नगरास परत जा.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.