इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 शमुवेल 28

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1त्या दिवसात असे झाले की पलिष्ट्यांनी आपली सैन्ये इस्राएलाशी लढायला एकत्र केली. तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “तुला आणि तुझ्या मनुष्यांना लढाईस माझ्याबरोबर यायचे हे तू खचित समज.”
2दावीदाने आखीशाला म्हटले, “तुझा दास काय करील हे तू खचित जाणशील.” तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “याकरिता तुला मी आपल्या मस्तकाचा रक्षक असा कायमचा ठेवीन.”
3शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांस व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते.
4पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्राएलांस एकत्र जमवून गिलबोवा येथे तळ दिला.
5शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे मन फार घाबरे झाले.
6शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही.
7मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, “म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन.” तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, “पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे.”
8मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण.”
9तेव्हा ती स्त्री त्यास म्हणाली, “पाहा शौलाने काय केले आहे, त्याने भूते ज्यांच्या परिचयाची आहेत अशा जाणत्यांना व जादूगिरांना देशातून कसे काढून टाकले आहे, हे तू जाणतोस तर मी मरावे असे करण्यासाठी तू कशाला माझ्या जिवाला पाश घालतोस?”
10तेव्हा शौलाने तिच्याशी शपथ वाहून म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे, या गोष्टीवरून तुला काही शिक्षा होणार नाही.”
11मग त्या स्त्रीने म्हटले, “तुझ्यासाठी मी कोणाला वर आणू?” तेव्हा तो म्हणाला, “माझ्यासाठी शमुवेलाला वर आण.”
12त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती स्त्री शौलाला म्हणाली, “तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस.”
13राजा तिला म्हणाला, “भिऊ नको. तू काय पाहतेस?” तेव्हा ती स्त्री शौलाला म्हणाली, “मी दैवत भूमीतून वर येताना पाहते.”
14मग तो तिला म्हणाला, “तो कोणत्या रूपाचा आहे?” तिने म्हटले, “म्हातारा मनुष्य झगा घातलेला असा आहे.” तेव्हा तो शमुवेल आहे असे शौल समजला आणि तो आपले तोंड भूमीकडे लववून नमला.
15मग शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर आणून का त्रास दिला आहे?” तेव्हा शौलाने उत्तर केले, “मी फार संकटात पडलो आहे. कारण पलिष्टी माझ्याशी लढाई करीत आहेत. आणि परमेश्वर मला सोडून गेला आहे, आणि तो भविष्यवाद्यांकडून किंवा स्वप्नांकडून मला उत्तर देत नाही; मी काय करावे हे तुम्ही मला कळवावे म्हणून मी तुम्हास बोलावले आहे.”
16तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे; तर तू कशाला मला विचारतोस?”
17जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे.
18कारण तू देवाची वाणी मानली नाही, आणि त्याचा तीव्र क्रोध अमालेकावर घातला नाही, म्हणून आज परमेश्वराने तुझे असे केले आहे.
19परमेश्वर इस्राएलास तुझ्याबरोबर पलिष्ट्यांच्या हाती देईल. उद्या तू तुझ्या मुलांसमवेत माझ्याजवळ असशील. परमेश्वर इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल.
20तेव्हा शमुवेलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच भूमीवर उपडा पडला आणि फार भयभीय झाला, व त्याच्यात काही शक्ती राहिली नाही. कारण सर्व दिवस आणि सारी रात्र त्याने काही भाकर खाल्ली नव्हती.
21मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, “पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत.
22तर आता मी तुम्हास विनंती करते, तुम्ही ही आपल्या दासीचा शब्द ऐका आणि मला तुमच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवू द्या; तो तुम्ही खा यासाठी की, तुम्ही वाटेने जाल तेव्हा तुम्हास शक्ती असावी.”
23परंतु त्याने नाकारून म्हटले, “मी खाणार नाही.” मग त्याच्या चाकरांनी व त्या स्त्रीनेही त्यास आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीवरून उठून पलंगावर बसला.
24त्या स्त्रीच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले; तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या बेखमीर भाकरी भाजल्या.
25मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.