इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 शमुवेल 19

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती.
2योनाथानाने दावीदाला म्हटले की, “माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा.
3मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.”
4तेव्हा योनाथानाने आपला बाप शौल याला दावीदाविषयी बरे बोलला आणि तो त्यास म्हणाला की, “राजाने आपला चाकर दावीद याचे वाईट करू नये कारण, त्याने तुमच्यासाठी फार चांगली कृत्ये केली आहेत.
5त्यानेही आपले शिर हाती घेवून पलिष्ट्याला जिवे मारिले आणि परमेश्वराने अवघ्या इस्राएलासाठी मोठे तारण केले ते तुम्ही ते पाहून हर्षित झाला; तर दावीदाला निष्कारण मारताना निर्दोष रक्त तुम्ही का पाडावे?”
6तेव्हा शौलाने योनाथानाची विनंती मानली आणि शौलाने अशी शपथ वाहिली, “परमेश्वराची शपथ मी त्यास मारणार नाही.”
7मग योनाथानाने दावीदाला बोलावले आणि योनाथानाने त्यास या सर्व गोष्टी सांगितल्या. योनाथानाने दावीदाला शौलाजवळ आणले आणि तो त्याच्याजवळ पूर्वीसारखा राहू लागला.
8यानंतर आणखी लढाई झाली आणि दावीदाने जाऊन पलिष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्यापुढून पळाले.
9मग परमेश्वराचा पासून दुष्ट आत्मा शौलावर आला आणि तो आपला भाला हाती धरुन आपल्या घरी बसला असता दावीद हाताने वाद्य वाजवीत होता.
10तेव्हा शौलाने भाल्याने दावीदाला भिंतीशी खिळण्यास पाहिले, परंतु तो शौलासमोरून निसटला आणि भाला भिंतीमध्ये घूसला. दावीदाने पळून आपला जीव त्या रात्री वाचवला.
11मग दावीदावर टपून सकाळी त्यास जिवे मारावे म्हणून शौलाने त्याच्या घरास दूत पाठविले आणि दावीदाची पत्नी हे वर्तमान त्यास सांगून असे बोलली की, “जर आज रात्री आपल्या जिवाचे रक्षण तुम्ही करणार नाही, तर सकाळी तुम्ही जिवे मारले जाल.”
12तेव्हा मीखलने दावीदाला एका खिडकीतून उतरवले आणि त्याने पळून जावून आपल्या जिवाचे रक्षण केले.
13मग मीखलने एक मूर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले.
14जेव्हा शौलाने दूत दावीदाला धरायास पाठविले, तेव्हा तिने म्हटले की, “तो दु:खनाईत आहे.”
15मग शौलाने दावीदाला पाहायास दूत पाठवून म्हटले की, “मी त्यास जीवे मारावे म्हणून त्यास पलंगावर असतानाच माझ्याकडे आणा.”
16ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मूर्ती होती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती.
17तेव्हा शौलाने मीखलला म्हटले की, “तू मला का फसविले आणि माझ्या वैऱ्याने निभावून पळून जावे म्हणून त्यास का पाठवून दिले?” मग मीखल शौलाला म्हणाली, “त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, मी तुला का मारावे?”
18याप्रमाणे दावीदाने पळून जाऊन आपल्या जिवाचे रक्षण केले. आणि शमुवेलाजवळ रामामध्ये येऊन त्याने आपणाला शौलाने जे सगळे केले होते ते सांगितले; तेव्हा तो व शमुवेल जाऊन नायोथात राहिले.
19मग शौलाला कोणी असे सांगितले की, पाहा दावीद रामा येथे नायोथात आहे.
20तेव्हा शौलाने दावीदाला धरायास दूत पाठविले परंतु भविष्यवाद्याची मंडळी भविष्यवाद करीत असता आणि शमुवेल त्यांच्यावर मुख्य आहे हे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा शौलाच्या दूतांवर आला आणि तेही भविष्यवाद करू लागले.
21मग हे शौलाला सांगितले असता, त्याने आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले.
22तेव्हा तो सुद्धा रामास जायास निघाला आणि सेखूमध्ये एका मोठ्या विहीरीजवळ येऊन त्याने असे विचारिले की, “शमुवेल व दावीद कोठे आहेत?” मग कोणी एकाने म्हटले, “पाहा ते रामातल्या नायोथात आहेत.”
23तेव्हा शौल रामातल्या नायोथात गेला आणि देवाचा आत्मा त्यावर आला आणि तो जाताना रामातल्या नायोथापर्यंत भविष्यवाद करीत गेला.
24मग त्यानेही आपली अंगवस्त्रे काढून शमुवेलापुढे भविष्यवाद केला आणि तो संपूर्ण दिवस आणि ती सर्व रात्र तो उघडा पडून राहीला; या कारणास्तव ते म्हणू लागले की, शौलही भविष्यवक्त्यांपैकी आहे की काय?
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.