इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

पेत्राचे पहिले पत्र 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र,
2देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, येशूच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हास कृपा व शांती विपुल मिळोत.
3आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
4आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे,
5आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.
6आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.
7म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.
8तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता.
9कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.
10तुम्हास प्राप्त होणार्‍या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते.
11त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते.
12त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हास शुभवर्तमान सांगणार्‍यांनी आता ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या, त्यामध्ये ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.
13म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.
14तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
15परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.
16कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.”
17आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे.
18कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.
19निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात.
20खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
21आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतांतून उठवून गौरव दिला.
22तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
23कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्‍या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात.
24कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते.
25परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.