इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 राजे 9

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1शलमोनाने परमेश्वराचे मंदिर आणि राजमहाल यांचे काम पूर्ण केले, व त्याच्या मनात जे होते त्याप्रमाणे त्याने केले.
2यापूर्वी गिबोनामध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते. त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्यास दर्शन दिले.
3परमेश्वर त्यास म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थानाकडे माझे मन व दृष्टी सतत राहील.
4तुझे वडिल दावीद यांच्या प्रमाणेच चांगल्या मनाने व सरळतेने तू माझ्यासमोर चाललास व माझ्या आज्ञा नियम पाळल्यास,
5तर तुझ्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी इस्राएलाच्या राजासनावर येईल. तुझे वडिल दावीद याला मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांची सत्ता इस्राएलावरून कधीच खुटंणार नाही.
6पंरतु तू किंवा तुझ्या मुलाबाळांनी हा मार्ग सोडला व माझ्या आज्ञांचे पालन केले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात,
7तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना हुसकावून लावीन. इतर लोकात तुम्ही निंदेचा विषय होणार. हे मंदिर मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे. पण माझे आज्ञापालन केले नाहीतर ते मी नजरेआड करीन.
8हे मंदिर नामशेष होईल; ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचे असे का केले बरे?’
9यावर इतर जण सांगतील, याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाच्या त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले. पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले. त्या दैवतांच्या हे भजनी लागले. म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले.”
10परमेश्वराचे मंदिर आणि महाल या दोन्हींचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला वीस वर्षे लागली.
11त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूप मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते.
12शलमोनाने हिराम सोराहून (तायर) ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला. पण त्यास ती तितकीशी पसंत पडली नाहीत.
13राजा हिराम म्हणाला, “माझ्या बंधो काय ही नगरे तू मला दिलीस?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो.
14हिरामने राजा शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी एकशें विस किक्कार सोने पाठवले होते.
15शलमोन राजाने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरूशलेम सभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.
16मिसरच्या फारो राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानी लोकांस त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते.
17शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोनही पुन्हा बांधले.
18तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे बांधली,
19शलमोनाने अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरूशलेमामध्ये, लबानोनात आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्यास हवे ते ते बांधले.
20इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते.
21इस्राएल लोकांस त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे.
22इस्राएल लोकांस मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकारी, कारभारी, सरदार, रथाधिपती आणि चालक अशा पदांवर होते.
23शलमोनाने हाती घेतलेल्या कामांवर साडेपाचशे अधीक्षक होते. मजूरांवर ते देखरेख करीत.
24फारोची कन्या आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले.
25शलमोन वर्षातून तीनदा वेदीवर होमबली आणि शांत्यर्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळीत असे. तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवत असे.
26एसयोन-गेबेर येथे शलमोन राजाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे.
27समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाश्यांबरोबर पाठवले.
28शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून चारशे वीस किक्कार सोने शलमोन राजाकडे आणले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.