इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 राजे 6

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1अशा तऱ्हेने शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देशातून बाहेर निघाल्यापासून चारशे ऐंशी वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथ्या वर्षी. जीव महिना जो दुसरा महिना होता त्यामध्ये तो परमेश्वराचे मंदिर बांधू लगला.
2शलमोन राजाने परमेश्वरासाठी जे मंदिर बाधंले त्याची लांबी साठ हात, रूंदी वीस हात व उंची तीस हात होती.
3मंदिराची देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रूंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर त्याची रूंदी दहा हात होती.
4मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या.
5मंदिराच्या मुख्य खोलीच्या लागून अनेक खोल्या एका रांगेत बांधल्या होत्या. तसेच मंदिराचे पवित्रस्थान व परमपवित्रस्थान यांच्या भिंतीस लागून सभोवार मजले केले.
6सर्वात खालच्या मजल्याची रूंदी पाच हात, मधल्या मजल्याची सहा हात व वरच्या मजल्याची सात हात होती; त्याने मंदिराच्या बाहेरच्या भिंतीस तोडे ठेवले होते, ते अशासाठी की, मंदीराच्या भिंतीत तुळ्या शिरू नयेत.
7भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले खाणीतूनच ते योग्य मापाने कापून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना हातोड्या, कुऱ्हाडी किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही.
8तळमजल्यावरील खोल्यांना मंदिराच्या दक्षिणेकडून आत जायला वाट होती. तिथून वरच्या मजल्यांवर जायला आतून जिने होते.
9शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता.
10मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची पाच पाच हात उंच होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते.
11परमेश्वराचे वचन शलमोनाकडे आले तो म्हणाला,
12“माझ्या सर्व आज्ञा आणि नियम तू पाळलेस तर तुझे वडिल दावीद यांना कबूल केले ते सर्व मी तुझ्यासाठी करीन.
13मी इस्राएल लोकांमध्ये राहील आणि त्यांना सोडून मी जाणार नाही.”
14शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले.
15मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती.
16मंदिराच्या आत मागच्या बाजूला वीस हात लांबीचा परमपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या.
17मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. त्याची लांबी चाळीस हात होती.
18हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे काहीच दर्शन होत नव्हते. या लाकडावर उमललेली फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीव काम केलेले होते.
19आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी गाभारा करवून घेतला होता.
20याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढविलेला होता. गंधसरुची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवलेली होती.
21शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोसुद्धा सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या.
22परमपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवून त्याने काम समाप्त केले.
23कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी दहा दहा हात होती. ते परमपवित्र गाभाऱ्यात ठेवले.
24करुबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.
25दुसरा करुबही दहा हात उंच होतो; दोन्ही करुब एका मापाचे व एका आकाराचे होते.
26आणि एका करुबाची उंची दहा हात होती, दुसऱ्या करुबाचीही तेवढीच होती.
27हे करुब देवदूत आतल्या परमपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते.
28हे करुब सोन्याने मढवले होते.
29दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेली होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती.
30दोन्ही खोल्यांची जमीन आतली व बाहेरील सोन्याने मढवली होती.
31शलमोनाने जैतूनाच्या लाकडाचे दरवाजे करून ते परमपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या बाह्या व कपाळपट्टी यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता.
32जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती.
33त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाच्या चौकटी बसवल्या होत्या; त्याने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता;
34त्याचे दोन दरवाजे देवदारू लाकडाचे होते प्रत्येक दरवाज्याला दोन दोन दुमटण्या होत्या.
35त्यावरही पुन्हा करुब, खजुरीची झाडे, उमलेली फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने मढवली होती.
36मग त्याने आतले अंगण बाधले. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि गंधसरुची एक ओळ अशा त्या होत्या.
37वर्षाचा चौथा महिना जीव मध्ये त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला.
38अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजेच वर्षाच्या आठव्या महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. शलमोनाला मंदिर बांधायला सात वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम नियोजित नमुन्या प्रमाणे तंतोतंत झाले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.