इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 राजे 12

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यास सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
2शलमोन राजाकडून पळाल्यावर नबाटाचा पुत्र यराबाम मिसरमध्ये जाऊन राहीला होता, त्याने हे ऐकले,
3लोकांनी त्यास बोलावून आणले, तेव्हा यराबाम व सर्व इस्राएल लोक रहबामाकडे येऊन त्यास म्हणाले,
4“तुझ्या वडिलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हास भरडून काढले. आता आमचे ओझे थोडे हलके कर. आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ म्हणजे आम्ही तुझी सेवा करु.”
5रहबाम म्हणाला, “तीन दिवसानंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले.
6शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामाने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांस मी काय सांगू?”
7यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.”
8पण रहबामाने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले.
9रहबाम त्यांना म्हणाला, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीतल्यापेक्षा “या लोकांस कामाचे जू हलके करून हवे आहे. त्यांना आता मी काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू?”
10तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडिलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे जू हलके करा.’ तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडिलांच्या कंबरेपेक्षा ही माझी करंगळी जास्त मोठी आहे.
11माझ्या वडिलांनी तुम्हावर भारी जू लादले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हास चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी तर तुम्हास विंचवानी शिक्षा करीन.”
12रहबाम राजाने त्या लोकांस “तीन दिवसानी यायला” सांगितले होते. त्याप्रमाणे यराबाम व सर्व इस्राएल लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.
13त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
14मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुमच्यावर कष्टाचे जू लादले. मी तर तुम्हास आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण ती तर तुम्हास विंचवानी शिक्षा करील.”
15या प्रकारे राजाने इस्राएल लोकांचे ऐकले नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा पुत्र यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहीया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.
16नवा राजा आपले म्हणणे मानत नाही, हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले, “आम्ही दाविदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय? नाही! इशायच्या जमिनीत आम्हास थोडाच वाटा मिळणार आहे काय? नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी तंबूकडे जा, या दाविदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य करू दे.” एवढे बोलून ते निघून गेले.
17तरीही यहूदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्राएल लोकांवर रहबामाची सत्ता होतीच.
18अदोराम नावाचा एक मनुष्य सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामाने त्यास लोकांशी बोलणी करायला पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथात बसून पळ काढला आणि तो यरूशलेम येथे आला.
19इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याविरुध्द बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे.
20यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांस कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्यास सर्व इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दाविदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.
21रहबाम यरूशलेमेला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एक लक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून शलमोनाचे राज्य परत मिळवायचा रहबामाचा विचार होता.
22शमाया नामक देवाच्या मनुष्याशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला,
23“शलमोनाचा पुत्र आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग,
24इस्राएलांनी आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे.” प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा करता करविता मीच होतो. या आदेशानुसार रहबामाचे सैन्य माघारी गेले.
25शखेम हे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करून यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल नगराची उभारणी केली.
26यराबाम मनाशीच म्हणाला, “हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे.
27लोक यरूशलेमेस परमेश्वराच्या घराकडे यज्ञ करावयास गेले तर यहूदाचा राजा रहबाम याच्याच मागे ते जातील मग ते माझा वध करतील व पुन्हा यहूदाचा राजा रहबाम याचे पुन्हा: होतील.”
28त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. “त्यांनी त्यास एक तोड सुचवली. त्यानुसार राजा यराबामाने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांस म्हणाला, तुम्हास यरूशलेमेला उपासनेसाठी जायची गरज नाही. हे इस्राएला तुम्हास मिसर देशाबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”
29राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले.
30पण त्याने हे मोठे पाप केले होते. इसाएलाचे लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले. पण हेही मोठेच पाप होते.
31उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामाने देऊळे बांधली. त्यासाठी याजकही त्याने फक्त लेवी वंशातले न निवडता इस्राएलाच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले.
32याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यराबामाने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बली अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवाळांसाठी बेथेल मधले याजकही नेमले.
33अशाप्रकारे यराबामाने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलच्या वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.