इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 राजे 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आता राजा दावीद म्हातारा होऊन उतारवयात पोहोंचला होता. त्यांनी त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्यास ऊब येईना.
2म्हणून त्याचे सेवक त्यास म्हणाले, “आपण आपल्या प्रभूराजासाठी एखादी तरुण कुमारी पाहूया. अशासाठी की तिने राजाची सेवा करावी आणि काळजी घ्यावी. आपल्या प्रभूराजाला ऊब यावी म्हणून ती तुझ्या उराशी निजेल.”
3आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलामध्ये सुंदर तरुण कन्यांचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची कन्या सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.
4ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.
5तेव्हा हग्गीथ्थेचा पुत्र अदोनीया स्वत:ला उंच करून म्हणाला, “मी राजा होईन.” त्याने स्वत:समोर रथ, घोडे तयार केले आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे ठेवली.
6“तू असे का करतोस?” असे म्हणून दाविदाने त्यास कधी दुखावलेले नव्हते, शिवाय अदोनीया हा दिसायलाही सुंदर होता, अबशालोमानंतर त्याचा जन्म झाला होता.
7सरूवेचा पुत्र यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्यांनी अदोनीयाला अनुसरून त्यास सहाय्य केले.
8पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमी रेई आणि दाविदाच्या पदरी असलेले वीर, ह्यानी अदोनीयाला अनुसरले नाही.
9एन-रोगेलजवळ जोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे कापले व आपले भाऊ, राजाची मुले आणि यहूदातील सर्व लोकांस, जे राजाचे चाकर होते त्यांना बोलावले.
10पण राजाचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना त्याने बोलावले नाही.
11तेव्हा शलमोनाची आई बथशेबा हिच्याशी नाथान बोलला, “हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा राजा झाला, आणि आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्तासुद्धा नाही, असे तुझ्या कानावर आले नाही काय?”
12तर आता चल मी तुला सल्ला देतो, अशारितीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील.
13तर आता तू दावीद राजा कडे जा आणि त्यास म्हण की, माझ्या स्वामी तुम्ही मला वचन दिले नाही काय? “खचित तुझा पुत्र शलमोन माझ्यानंतर राज्य करील, आणि तोच माझ्या राजासनावर बसेल?” तर मग अदोनीया का राज्य करीत आहे?
14“तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन व तुझ्या शब्दांची खात्री पटवून देईन.”
15तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या खोलीत गेली राजा फारच थकला होता, शुनेमची अबीशग राजाची सेवा करत होती.
16बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजा म्हणाला, “तुझी काय इच्छा आहे.”
17ती त्यास म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे की, माझ्यानंतर शलमोन राजा होईल व तोच या राजासनावर बसेल असे तुम्ही म्हणाला आहात.
18तर आता पाहा, अदोनीया राजा झाला आहे, आणि तुम्ही माझे स्वामी महाराज, तुम्हास याची माहितीही नाही का?
19त्याने तर अनेक गुरे आणि पुष्ट पशू, उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे, त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुले, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे. पण तुमचा सेवक शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही.
20महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत.
21नाहीतर माझे स्वामी राजे आपल्या वाडवडिलांसारखे झोपल्यावर, मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”
22बथशेबा हे राजाशी बोलत असतानाच, नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला.
23राजाच्या सेवकांनी त्यास सांगितले, “तेव्हा नाथान संदेष्टा राजाच्या समोर आला” व खाली लवून अभिवादन केले.
24मग नाथान म्हणाला, “महाराज, तुमच्यानंतर अदोनीया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय? आणि तो तुमच्या राजासनावर बसेल असे तुम्ही ठरवले आहे काय?”
25कारण आजच त्याने खाली जाऊन गुरे, पुष्ट पशू, मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमचे पुत्र, सेनापती, व अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत, “राजा अदोनीया चिरायु होवो” म्हणून घोषणा देत आहेत.
26पण मी, सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया आणि तुमचा सेवक शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही.
27माझे स्वामी, राजा आपल्याकडून हे आम्हाला न सांगता झाले का? यानंतर राजासनावर कोण बसेल? हे तुझ्या सेवकांना कळव.
28तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला पुन्हा माझ्याकडे बोलवा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर येवून उभी राहिली.
29मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो.
30पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राज्य करील, या राजासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. आजच हे मी पूर्ण करील.”
31बथशेबाने हे ऐकून राजाला लवून वंदन केले व म्हणाली, “माझे स्वामीराज दावीद चिरायु होवो.”
32मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले.
33राजा त्यांना म्हणाला, माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून खाली गीहोनाकडे जा.
34तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्यास इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की “शलमोन राजा चिरायू असो.”
35मग त्यास घेऊन माझ्याकडे या. तो या राजासनावर बसेल आणि राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा अधिकारी व्हावा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.
36यहोयादाचा पुत्र बनाया राजाला म्हणाला, “आमेन! परमेश्वर, माझ्या स्वामीचा देव याला मान्यता देवो.
37महाराज, जसा परमेश्वर आपल्याबरोबर होता. तोच परमेश्वर तसाच शलमोनाच्याही बरोबर राहील, आणि राजा शलमोनच्या राज्याची भरभराट करो आणि माझे स्वामी, दावीद आपल्यापेक्षा त्याचे राजासन महान करो.”
38सादोक याजक, नाथान भविष्यवादी, यहोयादाचा पुत्र बनाया आणि राजाचे सेवक करेथी व पलेथी यांनी खाली जाउन राजा दाविदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दाविदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.
39सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.
40मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांस उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.
41हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे?”
42यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान तिथे आला. अदोनीया त्यास म्हणाला, “ये तू भला मनुष्य आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”
43पण योनाथानाने अदोनीयाला उत्तर देऊन म्हणाला, “आमचा स्वामी, दावीद याने शलमोनाला राजा केले आहे.”
44दाविदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी आणि पलेथी आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले.
45मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहोन येथे शलमोन राजाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण आनंदाने नगरात परतले, नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे.
46शलमोन आता राज्याचा राजासनावर बसला आहे.
47राजाचा सेवकवर्ग स्वामी दावीद राजाला आशीर्वाद देत आहे. ते म्हणत आहेत, राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे देव शलमोनाचे नाव तुमच्यापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याचे राजासन तुझ्या राजासनापेक्षाही थोर होवो. तेव्हा पलंगावरूनच वाकून राजा अभिवादन करत होता.
48आणि राजा म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देव धन्य असो. परमेश्वराने माझ्या डोळ्यादेखत एका व्यक्तीला माझ्या राजासनावर बसवले आहे.”
49हे ऐकून अदोनीयाची आमंत्रित पाहुणे मंडळी घाबरली आणि त्यांनी तेथून पळ काढला.
50अदोनीया शलमोनाला घाबरला, व जावून तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे पकडून बसला.
51कोणीतरी शलमोनाला सांगितले, “अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही शलमोन राजाने मला तलवारीने मारणार नाही याचे अभिवचन द्यावे असे तो म्हणत आहे.”
52तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसासही इजा होणार नाही. पण त्याच्यात दुष्टता दिसली तर तो मरण पावेल.”
53मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या मनुष्यांना पाठवले, ते त्यास राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. “शलमोनाने त्यास घरी परत जाण्यास सांगितले.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.