इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 इतिहास 28

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1दावीदाने इस्राएलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूर वीर आणि लढवय्ये यांना यरूशलेमेत एकत्र बोलावले.
2नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.
3पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.’
4इस्राएलाचा देव परमेश्वर याने मला सर्वकाळ इस्राएलाचा राजा होण्यासाठी माझ्या वडिलाच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे. कारण त्याने यहूदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली.
5देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्राएलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे.
6त्याने मला म्हटले तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील. कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.
7माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.
8तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्वकाळचे वतन म्हणून द्यावा.
9हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत:करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील.
10परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.”
11दावीदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला.
12त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा.
13याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली.
14सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले.
15सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले.
16आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले.
17शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुप्याच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले.
18धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करुब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले.
19दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.”
20दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.
21देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामांत कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागिर कामात मदत करण्यास तुझ्याबरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.